Rahul Gandhi on Trump Tariff
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 25 टक्के आयात शुल्क (Tariff) आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला 'डेड इकोनॉमी' म्हटल्यामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या वक्तव्यावरून विरोधी पक्ष खासकरून काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. या मुद्द्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रतिक्रिया दिली असून, ट्रम्पच्या यांच्या वक्तव्याला ‘सत्य’ ठरवत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी म्हणाले, “ट्रम्प यांनी सत्य सांगितलं. संपूर्ण जगाला माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था संपलेली आहे. भाजप सरकारने अदानीसारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी देशाची आर्थिक घडी उध्वस्त केली आहे. पंतप्रधान मोदी आणि वित्तमंत्री वगळता सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे.”
काय म्हणाले होते ट्रम्प?
राहुल गांधी यांचा संदर्भ ट्रम्पच्या त्या विधानाशी होता, ज्यात त्यांनी म्हटले होते की, “मला काही फरक पडत नाही की रशिया आणि भारत त्यांची ‘डेड इकोनॉमी’ कशी सांभाळतात.”
अमेरिकेने बुधवारी भारतातून काही उत्पादनांच्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयावरून भारतातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रियंका गांधी (काँग्रेस खासदार): पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन मैत्री करत आहेत, पण त्याचे देशाला काय फळ मिळते? ट्रम्प यांच्या वक्तव्याने स्पष्ट झालं की भारताला या मैत्रीचा काहीच उपयोग झालेला नाही.”
राजीव शुक्ला (काँग्रेस नेते): ट्रम्प देशांवर दबाव टाकत आहेत. भारताने रशियाशी व्यापार करू नये, यासाठी धमकीवजा भूमिका घेत आहेत. हे भारताच्या हिताविरुद्ध आहे. मोदी म्हणतात ट्रम्प माझे मित्र आहेत, पण मित्रत्वाचे हेच फळ आहे का?
जयराम रमेश (राज्यसभा खासदार): “हाऊडी मोदी, नमस्ते ट्रम्प यांसारख्या शोभेच्या कार्यक्रमांमुळे भारताला काहीच फायदा झाला नाही. पाकिस्तान आणि चीननंतर अमेरिका आता तिसरी मोठी डोकेदुखी बनली आहे.
काँग्रेसने या टॅरिफ निर्णयाला जागतिक व्यापार संघटना (WTO) च्या नियमांचा स्पष्ट भंग असल्याचा आरोप केला आहे. व्यापार धोरणांमध्ये समानता राखण्याच्या WTO च्या तत्त्वांनुसार एकतर्फी टॅरिफ लावणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर मानले जाते.
भारत सरकारकडून अद्याप यावर सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र वाणिज्य मंत्रालयाने एवढं स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेशी चर्चा सुरू आहे आणि भारत आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी योग्य पावले उचलणार आहे.
अमेरिकेशी वाढती 'मैत्री' आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांच्या नावावर केंद्र सरकारने भारताचा 'ब्रँड' उंचावल्याचे दावे नेहमीच होत आले आहेत. मात्र ट्रम्प यांच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अर्थव्यवस्थेची स्थिती, व्यापार धोरणं आणि अमेरिकेसारख्या महाशक्तीबरोबरचं नातं याबाबत सरकारकडून पारदर्शक आणि ठोस स्पष्टीकरण अपेक्षित आहे.