पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी.  Pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi press conference : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह ३ प्रमुख मागण्या मान्‍य झाल्‍याच पाहिजेत : राहुल गांधी

१० वर्षांत देशात १५२ पेपरफुटी, पण एकालाही शिक्षा नाही

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi press conference : NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. २२) पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला हल्‍लाबोल केला. देशातील शिक्षणव्यवस्था सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

"सरकारच्या बजेटपेक्षा पालकांचा खर्च जास्त"

पत्रकार परिषदेत आकडेवारी सादर करत राहुल गांधी म्हणाले, "NEET परीक्षेसाठी दरवर्षी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांचा एकूण खर्च १.३२ लाख कोटी रुपये होतो. दुसरीकडे, संपूर्ण देशाच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारचे बजेट १.४ लाख कोटी रुपये आहे. तरीही सरकार अशा महत्त्वपूर्ण परीक्षेकडे दुर्लक्ष करत आहे."

१० वर्षांत १५२ पेपरफुटी, पण एकालाही शिक्षा नाही

"गेल्या १० वर्षांत देशात सुमारे १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत, परंतु एकाही दोषीला कडक शिक्षा झालेली नाही. हा एवढा मोठा अपराध घडत असताना कोणीच जबाबदार कसे नाही?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. पेपरफुटीमुळे सामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थी नैराश्यात गेले असून, काहींनी आपले जीवन संपवले आहे, शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज का करण्यात आला?" असा थेट सवाल करत राहुल गांधी यांनी देशातील शिक्षणव्यवस्था आता सर्वसामान्यांसाठी परवडणारी राहिली नसल्याची टीका केली.

राहुल गांधी यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या

  1. NEET पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

  2. आंदोलक तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज व हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.

  3. साडेसात कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देशवासीयांची आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT