Rajiv Gandhi death anniversary |
दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या वडिलांना आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. वीरभूमी येथे अभिवादन करताना त्यांनी वडिलांची आठवण प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत आहे. त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प केला.
सोशल मीडियावर एक्स वरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले की, "बाबा, तुमच्या आठवणी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात. तुमची अपूर्ण स्वप्ने सत्यात उतरवण्याचा माझा संकल्प आहे आणि मी ती नक्कीच पूर्ण करेन." वीरभूमी येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधी यांना अभिवादन केले.
राजीव गांधी यांच्या आठवणी सांगताना खर्गे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "भारताचे महान सुपुत्र राजीव गांधी यांनी लाखो भारतीयांमध्ये आशा निर्माण केली. २१ व्या शतकातील आव्हाने आणि संधींसाठी भारताला तयार करण्यात त्यांच्या दूरदर्शी आणि धाडसी भूमिका महत्त्वाची होती. यामध्ये मतदानाचे वय १८ पर्यंत कमी करणे, पंचायती राज मजबूत करणे, दूरसंचार आणि आयटी क्रांतीचे नेतृत्व करणे, संगणकीकरण कार्यक्रम राबवणे, शाश्वत शांतता करार मिळवणे, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम सुरू करणे आणि समावेशक शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारे नवीन शिक्षण धोरण सुरू करणे यांचा समावेश आहे."
सचिन पायलट यांनी राजीव गांधींचा उल्लेख एक अग्रेसर विचारसरणीचे नेते म्हणून केला. "राजीव गांधी हे एक दूरदर्शी नेते होते, ज्यांनी त्यांच्या नेतृत्व आणि आधुनिक विचारसरणीद्वारे प्रगतीशील दृष्टिकोन प्रदान करून देशाला दिशा दिली. त्यांच्या निर्णयांनी भारताला नवीन उंचीवर नेले," असे पायलट यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. आधुनिक भारताच्या उभारणीतील राजीव गांधींचे योगदान अविस्मरणीय असल्याचे म्हटले आहे. २० ऑगस्ट १९४४ रोजी त्यांचा जन्म झाला. राजीव गांधी यांनी त्यांच्या आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. ऑक्टोबर १९८४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ते वयाच्या ४० व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. त्यांनी २ डिसेंबर १९८९ पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक रॅलीदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली.