Rahul Gandhi On Trade Deal: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (दि. ११ फेब्रुवारी) राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अमेरिकेशी व्यापार कराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटीवरून टीका केली. राहूल गांधी यांनी केंद्र सरकारनं भारताचा वस्त्रद्योग, शेतकरी, आयटी कर्मचारी आणि सुरक्षा दलांचा सौदा केला असल्याचा आरोप केला. तसेच जर इंडिया आघाडी सत्तेत असती तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला बरोबरीनं वागणूक दिली असती.
राहुल गांधींनी आज संसदेत भाषण करताना ट्रम्प यांचे धोरणे ठरवताना असलेले अनिश्चित नेचर पाहता अमेरिकेशी डील करताना भारतानं तीन मुद्दे प्रामुख्यानं लक्षात घेतले पाहिजेत असं सांगितलं. ते म्हणाले, 'जर इंडिया आघाडी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी डील करत असती तर आम्ही काय केलं असतं हे तुम्हाला सांगतो. सर्वात आधी आम्ही राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितलं असतं की दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्हाला तुमचा डॉलर वाचवायचा आहे. आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही तुमचा आदर करतो. आम्हाला डॉलर वाचवण्यासाठी तुमची मदत करायची आहे.'
राहुल गांधी पुढे म्हणाले, 'मात्र जर तुम्हाला तुमचा डॉलर वाचवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा डॉलर वाचवण्यासाठी जी सर्वात महत्वाची गोष्ट लागणार आहे ती गोष्ट भारतात आहे. जर तुम्हाला आमचा डेटाचा अॅक्सेस हवा असेल तर सर्वात आधीत तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही आम्हाला समान दर्जाचं मानून आमच्यासोबत चर्चा केली पाहिजे. आम्ही तुमचे नोकर असल्यासारखे तुम्ही आमच्याशी बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या उर्जा सुरक्षेला सर्वात आधी प्राधान्य देणार आहे.'
राहुल गांधी यांनी अमेरिका भारतावर रशियाकडून तेल न घेण्याबाबत दबाव निर्माण करत आहे याबाबत हे वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी तिसरा मुद्दा सांगितला. ते म्हणाले, 'तिसरी गोष्ट आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितली असती की तुमचा मतदार कोण आहे याची आम्हाला कल्पना आहे. तुमचा शेतकरी मतदार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतकऱ्यांना संरक्षित करायचं आहे. मात्र आम्ही आमच्या शेतकऱ्यांना संरक्षित करणार आहे. आता याबाबत बरोबरीनं चर्चा करूयात. तुम्ही आमची तुलना पाकिस्तानच्या बरोबरीनं करू नका.'
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान, एस्टिन फाईल, अदानी, अनिल अंबानी आणि हरदीप पूरी यांचा देखील उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेसोबत अशा प्रकारची डील भारताच्या कोणत्याच पंतप्रधानांनी केली नसती असे देखील वक्तव्य केलं. मात्र त्यानंतर सत्ताधारी खासदारांनी जोरदार गदारोळ केला. पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी देखील राहुल गांधी यांना अर्थसंकल्पावर बोला असं म्हणत त्यांची ही वक्तव्ये संसदेच्या पटलावरून काढून टाकण्यासा सांगितली.