Rahul Gandhi on Maharashtra Elections
नवी दिल्ली : महाराष्ट्रात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'मॅच फिक्सिंग' करून विजय मिळवला. महाराष्ट्रातील 'मॅच फिक्सिंग' नंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल. मात्र मॅच फिक्स्ड निवडणुका लोकशाहीसाठी विष आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे. राहुल गांधींच्या या आरोपामुळे महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी सातत्याने निवडणूक हेराफेरीचे आरोप केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीवर पुन्हा टीका केली असून भाजपने विजय मिळवण्यासाठी 'मॅच-फिक्सिंग' केल्याचा आरोप केला आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेला त्यांचा लेख शेअर केला आहे. "महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुका लोकशाहीत हेराफेरी करण्याची एक ब्लूप्रिंट होती. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी पॅनेलमध्ये बदल करायचा. मतदार यादीत बनावट मतदारांचा समावेश करायचा आणि मतदारांची संख्या वाढवायची. भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बोगस मतदानाला लक्ष्य करायचं आणि शेवटी पुरावे लपवायचे, असा दावा त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होता, हे समजणे कठीण नाही. परंतु हेराफेरी ही मॅच फिक्सिंगसारखी आहे. फसवणूक करणारा पक्ष खेळ जिंकू शकतो, परंतु संस्थांना नुकसान पोहोचवतो आणि निकालावरील जनतेचा विश्वास उडतो. सर्व भारतीयांनी पुरावे पाहिले पाहिजेत. स्वतः निर्णय घ्या आणि उत्तरे मागा. कारण, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मॅच फिक्सिंग सुरू आहे, अशा आरोपांची राळ राहुल गांधी यांनी भाजवर उठवली आहे.
निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी पॅनेलची पुनर्रचना करणे
बनावट मतदारांची यादीत भर घालणे
मतदारांची संख्या वाढवणे
भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बोगस मतदानाला लक्ष्य करणे
पुरावे लपवणे
याआधी देखील राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक निकालावर आरोप केला होता. "महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८.९८ कोटी मतदार होते, जे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ९.२९ कोटी झाले, म्हणजे पाच वर्षांत ३१ लाखांची वाढ झाली. मात्र, पुढील फक्त ५ महिन्यांत ही संख्या आणखी ४१ लाखांनी वाढून ९.७० कोटीवर पोहोचली," असा आरोप त्यांनी केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले होते. 'तरुणांच्या वाढत्या सहभागामुळे आणि नवमतदार नोंदणी मोहिमेमुळे मतदार संख्येत वाढ झाली. मतदार वाढवणे किंवा कमी करणे असे प्रकार झाले नाहीत,' असे सांगत राहुल गांधी यांचे आरोप आयोगाने फेटाळले होते.
२०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने २३५ जागांसह मोठा विजय मिळवला. १३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपसाठी हा निकाल एक महत्त्वाचा टप्पा होता. महायुती आघाडीचा भाग असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही अनुक्रमे ५७ आणि ४१ जागांसह लक्षणीय यश मिळवले. महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसला फक्त १६ जागा मिळाल्या. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला २० जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फक्त १० जागा मिळाल्या.