Rahul Gandhi  (File Photo)
राष्ट्रीय

लोकसभेत विरोधकांचा आवाज दाबला जातोय : राहुल गांधी

सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : सभागृहात विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलण्याची संधी दिली जात नाही. पंतप्रधानांनी केलेल्या करारांबाबत मूलभूत प्रश्न उपस्थित केल्यावरही मला बोलू दिले गेले नाही, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चेदरम्यान राहुल गांधी बोलत होते.

लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, संसद हे देशातील जनतेच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ आहे. हे सभागृह कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते. मात्र प्रत्यक्षात विरोधी पक्षाचे खासदार बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर त्यांना वारंवार रोखले जाते, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या संसदीय इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याला सभागृहात बोलण्याची संधी दिली गेली नाही. संसदेत सर्व मतांना वाव मिळणे आवश्यक असताना विरोधकांच्या आवाजाला दाबले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी म्हणाले की, यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काही करारांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे, एपस्टीन प्रकरण आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मात्र हे प्रश्न मांडताच त्यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हे विषय देशातील जनतेसाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमित शाह यांच्याकडून सभागृहात अपशब्दांचा वापर : प्रियंका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी यांनी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. देशात वाढती महागाई आणि बेरोजगारी यासाठी सत्ताधारी पक्षाच्या धोरणांना जबाबदार धरत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. महागाई आणि बेरोजगारीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. लोकांनी अजून किती सहन करायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, अविश्वास प्रस्ताव राहुल गांधी यांच्यावर नसून लोकसभा अध्यक्षांवर आहे, त्यामुळे चर्चेचा विषय त्याच मर्यादेत राहायला हवा तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात अपशब्द वापरल्याचा आरोपही त्यांनी केला. सभागृहात असे शब्द वापरले जात असताना लोकसभा अध्यक्षांनी त्यांना रोखले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT