राहुल गांधींचा नवा पत्ता, बंगला क्रमांक ५, सुनेहरी बाग रस्ता, दिल्ली?
राहुल गांधींचा नवा पत्ता, बंगला क्रमांक ५, सुनेहरी बाग रस्ता, दिल्ली? 
राष्ट्रीय

Rahul Gandhi News | राहुल गांधींचा नवा पत्ता, बंगला क्रमांक ५, सुनेहरी बाग रस्ता, दिल्ली?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा नवा पत्ता बंगला क्रमांक ५, सुनेहरी बाग रस्ता, नवी दिल्ली असा असण्याची शक्यता आहे. सध्या राहुल गांधी सोनिया गांधींसोबत राहतात. दरम्यान, राहुल गांधी उत्तर प्रदेशातील सुलतानपुरमध्ये असताना प्रियंका गांधींनी सुनेहरी बाग रस्त्यावरील बंगला क्रमांक ५ ला भेट देऊन पाहणीही केली.

लवकरच मिळणार विरोधी पक्ष नेत्याचे निवासस्थान

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी अधिकृत निवास वाटप आणि सुशोभीकरणानंतर नव्या निवासस्थानी स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल यांना केंद्रीय मंत्र्यांना दिला जाणारा टाइप ८ प्रकारातील बंगला मिळू शकतो.

राहुल सध्या सोनिया गांधी यांच्यासोबत राहतात

सध्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्यासोबत १० जनपथ येथे राहत आहेत. यापूर्वी २००४ ते एप्रिल २०२३ दरम्यान राहुल गांधी १२, तुघलक लेन या ठिकाणी राहत होते. मार्च २०२३ मध्ये राहुल गांधींना मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. 

खासदारकी रद्दनंतर 'तुघलक लेन' निवासस्थान काढून घेतले होते

परिणामी १२, तुघलक लेन हे निवासस्थान काढून घेण्यात आले होते. पुढे मानहाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले होते. त्यानंतर लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने राहुल गांधींना १२ तुघलक लेन येथील बंगला देऊ केला होता. मात्र माझे घर संपूर्ण भारत आहे म्हणत राहुल गांधींनी तो स्विकारला नव्हता.

SCROLL FOR NEXT