नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर राहुल गांधींचे आगमन झाले. ऐन निवडणुकीच्या मोसमात पक्षांतर्गत होत असलेल्या कुरबुरीवर राहुल गांधी आणि पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज होते. दिल्लीत आधीच काँग्रेसची अवस्था आधीच रसातळाला गेल्यासारखी आहे. अशा परिस्थितीतही काँग्रेसमध्ये वादविवाद आहेतच. त्याचा परिणाम निवडणुकीवर होतो आणि म्हणूनच यापूर्वी राहुल गांधींनी नाराजीतून त्यांच्या काही सभा रद्द केल्या होत्या.
दिल्ली विधानसभा सत्ताधारी आपसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेससाठीही महत्वाची आहे. यात आप आणि भाजप सत्ता मिळवण्यासाठी लढत असताना काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत वाद शमताना दिसत नव्हते. खरे तर आप आणि भाजप दिल्लीच्या लढाईत काँग्रेसला पाहिजे तसे महत्व देताना दिसत नाही. काही दिवसांपुर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांच्या काही प्रचार सभा रद्द केल्या होत्या. अर्थात या सभा रद्द होण्यासाठी राहुल गांधींच्या प्रकृतीचे कारण देण्यात आले होते. मात्र फिटनेसच्या बाबतीत विरोधकही राहुल गांधींचे उदाहरण देतात. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केवळ ८-१० दिवस बाकी आहेत. त्यामुळे झाले गेले विसरून राहुल गांधी पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेसाठी सज्ज झाले आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर आणि महु येथे झालेल्या ‘जय बापू, जय संविधान’ कार्यक्रमानंतर राहुल गांधींनी दिल्लीतील दोन विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या. या सभेच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीसह केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. राहुल गांधींच्या या सभेतून काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा तर मिळाली मात्र ती टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. निवडणुका लढताना सत्ता मिळवणे हे सर्वच राजकीय पक्षांचे उद्दिष्ट असते. मात्र काँग्रेससाठी दिल्लीत स्वतःला पुन्हा प्रस्थापित करणे, हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. कारण भाजप आणि आपच्या लढाईत स्वतःसाठी जागा निर्माण करणे ही देखील काँग्रेससाठी मोठी लढाई आहे. राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी हे ही सक्रिय होत आहेत. इतर पक्षांप्रमाणेच काँग्रेसनेही काँग्रेस शासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना दिल्ली विधानसभेसाठी कामाला लावले आहे.