नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या त्यांच्या एका मिश्किल टिप्पणीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांचे गुंतवणूक सल्लागार मुथुकृष्णन दंडपाणी यांनी राहुल गांधींसोबतच्या व्यावसायिक संबंधांवर भाष्य करणारी एक सविस्तर पोस्ट 'X' वर शेअर केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून अत्यंत खिलाडूवृत्तीने उत्तर दिले आहे.
गुंतवणूक सल्लागार मुथुकृष्णन दंडपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधींचे कौतुक करताना म्हटले होते की, राजकीय विचार भिन्न असूनही राहुल गांधींनी नेहमीच व्यावसायिक संबंधांचा आदर केला आहे. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी लिहिले, "मुथू जी, तुमचे राजकीय विचार तुमचे वैयक्तिक आहेत, पण कृपया माझ्या गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न्स मात्र लवकर वाढवा." राहुल गांधींच्या या मिश्किल टिप्पणीने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय वर्तुळातही याची चर्चा रंगली आहे.
मुथुकृष्णन दंडपाणी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये २०१३ पासून राहुल गांधींशी असलेल्या व्यावसायिक संबंधांचा उलगडा केला. २०१३ मध्ये 'यूपीए-२' चे सरकार असताना एका क्लायंटच्या माध्यमातून त्यांची राहुल गांधींशी ओळख झाली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत राहुल गांधींच्या 'म्युच्युअल फंड' गुंतवणुकीचे व्यवस्थापन दंडपाणीच पाहत आहेत. विशेष म्हणजे, २०१४ ते २०२४ या काळात दंडपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उघडपणे समर्थन केले होते, तरीही राहुल गांधी किंवा त्यांच्या कार्यालयाने कधीही त्यांच्या राजकीय भूमिकेवर आक्षेप घेतला नाही.
दंडपाणी यांनी आपल्या अनुभवाचे कथन करताना सांगितले की, "आम्ही अनेकदा ईमेलद्वारे संवाद साधला आणि फोनवरही बोललो, परंतु राहुल गांधींनी कधीही माझ्या राजकीय मतांचा विषय काढला नाही. ते व्यावसायिक सेवा आणि वैयक्तिक राजकीय श्रद्धा यातील फरक स्पष्टपणे जाणतात." इतकेच नव्हे तर, राहुल गांधींनी एकदा दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यावसायिक कामासाठी सल्लागार निवडताना दंडपाणी यांचे मत विचारले होते, हेदेखील त्यांनी आवर्जून नमूद केले.
राहुल गांधींच्या स्वभावाचे वर्णन करताना दंडपाणी म्हणाले की, प्रत्येक संवादात राहुल गांधी अत्यंत आदराने बोलतात आणि त्यांच्या वागण्यात कधीही अहंकार जाणवत नाही. "मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे आणि आयटी सेलद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या प्रतिमा आणि सत्य परिस्थिती यात किती फरक असतो, हे मला जगाला सांगायचे होते," असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या पोस्टच्या शेवटी दंडपाणी यांनी एक भीतीही व्यक्त केली होती. "कदाचित ही पोस्ट लिहिल्यामुळे राहुल गांधी माझे व्यावसायिक कंत्राट संपवू शकतात, पण ते मला मान्य आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट हा कधी ना कधी होतोच," असे त्यांनी म्हटले होते. मात्र, राहुल गांधींनी त्यावर अत्यंत सकारात्मक आणि विनोदी पद्धतीने उत्तर देऊन दंडपाणी यांच्या व्यावसायिक कौशल्याचाच आदर केल्याचे दिसून आले आहे. "मी राहुल गांधींना राजकारणी म्हणून ओळखत नाही, पण गेल्या १४ वर्षांच्या अनुभवावरून मी इतकेच सांगू शकतो की, ते व्यावसायिकांचा सन्मान करणारे एक उत्तम व्यक्ती आहेत," अशा शब्दांत दंडपाणी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.