पाटणा ः बिहार निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर हल्ला चढवला. मोदी मतांसाठी काहीही करतात, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही मतांच्या बदल्यात नरेंद्र मोदींना नाचायला सांगितले, तर ते मंचावर नाचतील, असे गांधी मुझफ्फरपूरमध्ये म्हणाले. ते राजद नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासोबत एका सभेला संबोधित करत होते.
छठपूजेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी दिल्लीतील प्रदूषित यमुनेत प्रार्थना करणारे भाविक आणि पंतप्रधानांनी विशेष बनवलेल्या तलावात घेतलेली डुबकी, यातील विरोधाभास दाखवून दिला. नितीश कुमार यांनी 20 वर्षे बिहारची सत्ता सांभाळूनही मागासलेल्या वर्गासाठी काहीही केले नाही, असेही राहुल यांनी सांगितले.