Rahul Gandhi said about terrorist attacks
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांवरून राहूल गांधींनी सरकारवर निशाणा साधला File Photo
राष्ट्रीय

Rahul Gandhi|सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमधील परिस्थिती बिघडली : राहुल गांधी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजप आणि रालोआ सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना बसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून काँग्रेसने हा हल्लाबोल केला. जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४ जवान शहीद झाले, याबद्दल लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला.

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून राहुल गांधी यांनी 'एक्स' वर पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे. वारंवार होणाऱ्या सुरक्षेतील त्रुटींची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारावी आणि सैनिकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, यासाठी संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही डोडा येथील दहशतवादी चकमकीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३६ दिवसांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यांचा फटका जम्मू-काश्मीरला बसत आहे. हे सरकारने समजून घेतले पाहिजे, असे खर्गे म्हणाले. एक राष्ट्र म्हणून आपल्याला दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढायचे आहे. काँग्रेस सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची शपथ घेऊन ३८ दिवस झाले आहेत. या ३८ दिवसांत ९ मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. ज्यामध्ये १२ जवान शहीद झाले आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्षांनी केला.

३८ दिवसांतील ९ दहशतवादी हल्ले

  • ९ जून : रियासी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १० नागरिक ठार, ५० जखमी

  • ११ जून : कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान आणि १ पोलीस अधिकारी जखमी

  • ११ जून : हिरानगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १ सीआरपीएफ जवान शहीद

  • १२ जून : डोडा येथे दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

  • २६ जून : डोडा येथे झालेल्या चकमकीत १ जवान जखमी

  • ६ जुलै : कुलगाममध्ये दहशतवादी चकमकीत २ जवान शहीद

  • ७ जुलै : राजौरी येथे दहशतवादी हल्ल्यात १ जवान जखमी

  • ८ जुलै : कठुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद, ५ जखमी

  • १६ जुलै : डोडा येथील दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत ४ जवान शहीद

SCROLL FOR NEXT