उत्तर प्रदेशातील संभल येथे जामा मशिद प्रकरणावरुन हिंसाचार सुरु आहे. Image source by X
राष्ट्रीय

रस्त्यावर राहुल गांधी- संसदेत काँग्रेस, संभलच्या मुद्द्यावरून राजकारण तापले

UP Sambhal Riots | दिल्ली-गाझियाबाद सीमेवर उत्तर प्रदेश प्रशासन आणि काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : संभल हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी रस्त्यावरून संसदेपर्यंत गदारोळ झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संभलला भेट देण्यासाठी गेले होते. मात्र उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना भेट देण्यापासून रोखले. याचे पडसाद संसदेत पहायला मिळाले. लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने सभागृहातून वॉकआऊट केले. सभागृहात काँग्रेसला समाजवादी पक्षाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. वॉकआउटमध्ये काँग्रेसच्या मित्रपक्षाची भूमिका बजावत ‘सपा’ही सामील झाला.

याआधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते संभलला भेट देण्यासाठी गेले होते. मात्र दिल्लीतून बाहेर पडताच उत्तर प्रदेश प्रशासनाने गाझीपूर सीमेवर राहुल गांधींच्या ताफ्याला रोखले. संभलमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. त्यामुळे तेथे कोणालाही जाण्यास परवानगी नाही, असे प्रशासनाने राहुल गांधी यांना सांगितले. पोलिसांनी तिथे बॅरिकेड्स लावले होते. संभलचे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेंसिया यांनी शेजारच्या जिल्ह्यांमध्ये तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून राहुल गांधींना त्यांच्या जिल्ह्यांच्या सीमेवर थांबवण्याचे आवाहन केले होते.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या ताफ्याला गाझीपूर सीमेवर थांबवण्यात आले. राहुल गांधी म्हणाले की, मी विरोधी पक्षाचा नेता आहे आणि हिंसाचार पीडितांना जाऊन भेटण्याचा माझा अधिकार आहे. मात्र शांतता आणि सुरक्षिततेचे कारण देत प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. यादरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पोलिसांना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला रोखण्याच्या आदेशाची प्रत दाखवण्यास सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी त्यास नकार देत राहुल गांधींच्या ताफ्याला पुढे जाऊ दिले नाही. यादरम्यान दिल्ली-गाझियाबाद सीमेवर उत्तर प्रदेश प्रशासन आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दोन तासांहून अधिक काळ हाय व्होल्टेज ड्रामा चालला. प्रशासनाने त्यांना पुढे जाऊ न दिल्याने राहुल गांधी पुन्हा दिल्लीला परतले.

भाजप सरकार अपयश लपवत असल्याचा राहूल गांधी यांचा आरोप

भाजप सरकार आपले अपयश लपवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, मी एकटा जायला तयार आहे, पण प्रशासनाला हे देखील मान्य नव्हते. हे संविधानाच्या विरोधात आहे. भाजप का घाबरतोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपले अपयश लपवण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहन का देत आहे? असा सवाल त्यांनी केला.

संविधानाचा अवमान होत आहे : खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, संविधानाचा अवमान केला जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संभलमधील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यापासून रोखल्याच्या घटनेतून हे सिद्ध होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT