Rahul Gandhi Press Conference Pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi: कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीने केलं 22 वेळा मतदान; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi Press Conference Live: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत ‘H Files’ नावाचे सादरीकरण करत हरियाणातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदार घोळ झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की एका युवतीने वेगवेगळ्या नावांनी 22 वेळा मतदान केले.

Rahul Shelke

Rahul Gandhi Press Conference: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत ‘H Files’ नावाचे सादरीकरण करत भाजप आणि निवडणूक आयोगावर मोठे आरोप केले. त्यांनी दावा केला की, हरियाणासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वोट चोरी आणि मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे.

राहुल गांधी म्हणाले, “हरियाणामध्ये आमच्या उमेदवारांकडून तक्रारी आल्या की काहीतरी गंभीर गैरप्रकार सुरू आहेत. पाच प्रमुख एक्झिट पोल्सने काँग्रेस जिंकेल असं दाखवलं होतं, पण निकाल पूर्णपणे उलट गेले. या वेळी पोस्टल बॅलेट्स आणि प्रत्यक्ष निकालात प्रचंड तफावत दिसली.”

“एका युवतीने 22 वेळा मतदान केलं”

राहुल गांधी यांनी या सादरीकरणात खोट्या मतांबाबत धक्कादायक दावा केला. ते म्हणाले “हरियाणात एका युवतीने वेगवेगळ्या नावांनी 22 वेळा मतदान केलं. ती कधी ‘सीमा’, कधी ‘स्वीटी’, तर कधी ‘सरस्वती’ बनली.”

त्यांनी पत्रकार परिषदेत त्या युवतीचा फोटो दाखवत सांगितले की, “ही व्यक्ती खरी भारतीय मतदार नाही. या फोटोचा वापर बनावट मतदार म्हणून करण्यात आला आहे आणि प्रत्यक्षात ही ब्राझीलमधील मॉडेल मॅथ्यूज फेरेरो आहे.”

राहुल गांधींच्या मते, हरियाणातील राई विधानसभा मतदारसंघात या महिलेनं 10 वेगवेगळ्या बूथवर 22 मतं टाकली. राहुल गांधी यांनी दावा केला की हरियाणात सुमारे 25 लाख मतं चोरीला गेली, आणि 5.21 लाख मतदारांची नावे डुप्लिकेट आहेत. राज्यात एकूण 2 कोटी मतदार आहेत, म्हणजेच जवळपास 12 % मतदार बनावट आहेत म्हणजे प्रत्येक 8 पैकी 1 मतदार फेक आहे.

राहुल गांधी म्हणाले, “ही फक्त वोट चोरी नाही, तर युवा पिढीच्या भविष्याची चोरी आहे. हा लोकशाहीविरोधी कट आहे जो काँग्रेसच्या विजयाला पराभवात बदलण्यासाठी रचला गेला.”

राहुल गांधी म्हणाले की, “पाचही मोठ्या एक्झिट पोल्सनी काँग्रेसला आघाडी दाखवली होती. पण निकाल पूर्णपणे वेगळा लागला. हरियाणात काँग्रेस फक्त 22,789 मतांनी पराभूत झाली. हे सिद्ध करतं की काहीतरी गंभीर घोटाळा झाला आहे.”

राहुल गांधींनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या एका कथित व्हिडिओचा उल्लेख केला, ज्यात सैनी म्हणताना दिसतात, “आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे, आम्ही जिंकत आहोत. भाजप एकतर्फी सरकार बनवणार आहे.”

राहुल गांधींनी मतदार यादीतील विसंगतींची उदाहरणेही दिली “काही ठिकाणी पुरुषाचं नाव असून फोटो स्त्रीचा आहे, काही ठिकाणी मुलाचा फोटो पण वय 70 वर्षं लिहिलंय, तर काही ठिकाणी वृद्ध व्यक्तीचा फोटो पण वय कमी दाखवलं आहे.” त्यांनी सांगितले की हे सर्व बनावट ओळखपत्र वापरून चार-चार ठिकाणी मतदान केलेले मतदार आहेत.

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर (ECI) आरोप केला की, “आयोगाकडे मतदानाचे व्हिडिओ फुटेज होते, पण ते डिलीट केले गेले. ECI कडे अशा डुप्लिकेट बूथ्स ओळखण्यासाठी सॉफ्टवेअर असतानाही ते वापरण्यास नकार दिला गेला, कारण आयोग सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT