Rahul Gandhi  Pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi Claim: देशात आणीबाणी लागणार; मोदी वर्षभरात पंतप्रधानपद सोडणार, राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

Rahul Gandhi Claim PM Modi: राहुल गांधी यांनी पुढील एका वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नसल्याचा दावा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi Claim PM Modi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक दावे करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी पुढील एका वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर राहणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच देशात मोठे आर्थिक संकट येण्याची आणि लोकांच्या विरोधामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणातील व्यवस्था आता ढासळू लागली आहे. त्यांच्या मते, सरकारच्या आतूनच संस्थात्मक पातळीवर विरोध सुरू झाला असून विविध यंत्रणांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

'मोठी आर्थिक सुनामी येणार'

राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतही गंभीर इशारा दिला. त्यांच्या मते, केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला संरक्षण देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या यंत्रणा कमकुवत केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात देशाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

ते म्हणाले, "देशात अशी आर्थिक त्सुनामी येणार आहे, जी लोकांनी यापूर्वी कधीच पाहिलेली नाही. अर्थव्यवस्थेचे संरक्षण करणारे कवचच काढून टाकण्यात आले आहे."

'व्यवस्थेच्या आतूनच बंड सुरू'

राहुल गांधी यांनी दावा केला की, काही महत्त्वाच्या संस्थांमधून त्यांना मेसेज येत आहेत. निवडणूक आयोग, गुप्तचर यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेतील काही व्यक्तींकडून असंतोष व्यक्त केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांच्या मते, पूर्वी पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या संस्था आता स्वतंत्रपणे विचार करू लागल्या असून सत्तेच्या विरोधात आवाज उठवत आहे.

आणीबाणीची शक्यता व्यक्त

राहुल गांधी यांनी पुढे दावा केला की, लोकांमधील वाढता असंतोष दडपण्यासाठी सरकार कठोर पावले उचलू शकते. त्यांनी देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली.

त्यांच्या मते, जनतेचा दबाव वाढल्यास सत्ताधारी पक्ष परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू शकतो.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी वर्षभरात पदावर राहणार नाहीत, आर्थिक संकट येणार आहे आणि आणीबाणी लागू शकते, या दाव्यांमुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

मात्र, राहुल गांधी यांनी केलेले हे दावे त्यांच्या वैयक्तिक राजकीय आकलनावर आधारित असून त्यासंदर्भात कोणतेही अधिकृत पुरावे त्यांनी सार्वजनिकपणे सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विधानांवर आता सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT