Rahul Gandhi on BJP, RSS : "मी भारतीय आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांचा जितका सखोल अभ्यास करतो, तितके मला अधिक स्पष्ट होत जाते की भाजप आणि आरएसएस हे असभ्य, लोभी, जातिवादी आणि पुरुषप्रधान मानसिकतेचे लोक आहेत, ज्यांना आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांची अजिबात समज नाही," अशा शब्दांमध्ये आज (दि. २२ नोव्हेंबर) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप-संघांवर हल्लाबोल केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील पोस्टबरोबर त्यांनी 'अर्धनारीश्वर'ची प्रतिमाही शेअर केली आहे.
"मी भारतीय आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांचा जितका खोलवर अभ्यास करतो, तितके हे अधिक स्पष्ट होत जाते की भाजप आणि संघाचे लोक हे अडाणी, लोभी आणि जातीयवादी पुरुषसत्ताक मानसिकतेचे आहेत. त्यांना आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांचे कोणतेही ज्ञान नाही," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टसोबत राहुल गांधी यांनी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या 'अर्धनारीश्वर' रूपातील एका शिल्पाचा फोटोही शेअर केला आहे. अर्धनारीश्वर हे भगवान शिव आणि पार्वती यांचे एकत्रित रूप मानले जाते. यामध्ये अर्धा भाग पुरुषाचा तर अर्धा भाग स्त्रीचा दर्शवला जातो.
काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांच्या 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey Of Love) या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी आपल्या आई-वडिलांच्या नात्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीका केल्यानंतर राहुल गांधी यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना राहुल गांधी म्हणाले होते की, "जेवताना माझे आई-वडील एकत्र बसायचे आणि माझी आई वडिलांच्या मांडीवर बसायची. मला ही एक सामान्य गोष्ट वाटायची. त्यामुळे मी जेव्हा माझ्या मित्रांच्या घरी जायचो आणि तिथे त्यांचे आई-वडील असे बसलेले दिसायचे नाहीत."
राहुल गांधींच्या या विधानावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती. सरमा यांनी राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ 'X' वर शेअर करत खोचक टोला लगावला होता. "माफ करा मॅडम, तुमच्या आयुष्यातील इतक्या खास दिवशीही ते तुम्हाला लाजिरवाणे होण्यापासून वाचवू शकले नाहीत. देशाला हे खूप आधीच समजले आहे. आशा आहे की तुम्हालाही आता हे कळेल; हे 'प्रॉडक्ट' आता लाँचिंग आणि री-लाँचिंगच्या पलीकडे गेले आहे," असे सरमा म्हणाले होते.
टीकेला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटले होते की, भीती, राग आणि द्वेषाने भाजप व संघाच्या समर्थकांच्या मनात असे जाळे विणले आहे, ज्यामुळे ते प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. यावेळी त्यांनी बाराव्या शतकातील एका मंदिरातील शिल्पाचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये माता पार्वती भगवान शिवाच्या मांडीवर बसलेल्या दिसत आहेत. "एक खरा हिंदू या नात्याने त्यांना या जाळ्यातून मुक्त करणे हे माझे कर्तव्य आहे, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आपुलकीचा आनंद अनुभवता येईल. सत्यम शिवम सुंदरम," असे राहुल गांधींनी म्हटले होते.
हिंदू संत स्वामी परमात्मानंद सरस्वती यांनी शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना एक खुले पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी राहुल गांधींनी अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका प्रतिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले आहे. हे छायाचित्र नुकतेच राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले होते. स्वामी सरस्वती म्हणतात की, या प्रतिमेद्वारे राहुल यांना नेमका काय संदेश द्यायचा होता हे त्यांना माहीत नसले, तरी त्याचे खरे महत्त्व स्पष्ट करणे त्यांना आवश्यक वाटले. "मला समजले आहे की, तुम्ही भगवान शिवांच्या मांडीवर माता पार्वती विराजमान असलेली एक प्रतिमा पोस्ट केली आहे. तुम्हाला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे मला माहीत नाही, परंतु मला हे पत्र लिहिणे गरजेचे वाटले. हे केवळ एक चित्र नाही; यात एक सखोल अर्थ दडलेला आहे. हे उपनिषदांमधील गहन ज्ञानाचे प्रतिबिंब आहे."
दरम्यान, काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी एका अत्यंत आवश्यक विषयावर चर्चा सुरू केली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. "प्रेम लपवण्याची गरज नाही, आपुलकी हा कमकुवतपणा नाही आणि समानतेची सुरुवात आपल्या जोडीदाराला समान वागणूक देण्यापासून होते," असे काँग्रेसने 'X' वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.