नवी दिल्ली : अमेरिकेतील न्यायालयाने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावरील गुन्हेगारी आरोप कायमस्वरूपी रद्द केले आहेत. या निर्णयानंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला. देशाचे हित पणाला लावून हा निर्णय घेतला गेला असल्याचा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अमेरिकन न्याय विभागाच्या विनंतीबाबतची बातमी शेअर करत लिहिले, या संपूर्ण प्रकरणामागे दिसते त्यापेक्षा बरेच काही वेगळे आहे. एका तडजोड केलेल्या पंतप्रधानांना भारताच्या हिताचा सौदा करावा लागला. आज भारत यासाठी खूप मोठी किंमत मोजत आहे.
न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश निकोलस गरोफिस यांनी अमेरिकन न्याय विभागाची याचिका मंजूर करत गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावरील आरोप कायमस्वरूपी रद्द केले. १० ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या ४७ पानांच्या या आदेशामुळे अदानी समूहावर गेल्या दोन वर्षांपासून असलेले मोठे कायदेशीर संकट टळले आहे.
न्यायालयाने सिक्युरिटीज फ्रॉड कॉन्स्पिरसी, वायर फ्रॉड आणि सिक्युरिटीज फ्रॉडशी संबंधित महत्त्वाचे कलम रद्द केले आहेत. ‘विथ प्रिज्युडिस’ हे आरोप रद्द करण्यात आल्याने, हे गुन्हे पुन्हा दाखल केले जाऊ शकत नाहीत.