नवी दिल्ली : भारताच्या औषध नियामक प्राधिकरणाने रेबीजवरील प्रसिद्ध लस ‘अभयरॅब’चा एक संच प्रयोगशाळा चाचणीत निकृष्ट आणि बनावट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यानंतर देशभरातील औषध नियामकांना तत्काळ पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कसौली येथील मध्यवर्ती औषध प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत संच क्रमांक केई २५०१२ मधील नमुना आवश्यक गुणवत्तेनुसार नसल्याचे स्पष्ट झाले. औषध महानियंत्रक राजीव सिंह रघुवंशी यांनी २७ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांच्या औषध नियामकांना पत्र लिहून या संचाच्या वितरणावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’ने स्पष्ट केले आहे की, संशयित नमुने दिल्लीतील मुखर्जीनगर येथील एका अनधिकृत निवासी परिसरातून जप्त करण्यात आले होते. प्रयोगशाळेतील १७ विसंगतींवरून हे सिद्ध होते की या बाटल्या कंपनीने तयार केलेल्या नाहीत. कंपनीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या संचाच्या ८३,३७० अधिकृत बाटल्या बाजारात पाठवण्यात आल्या होत्या. अधिकृत रुग्णालये आणि नोंदणीकृत फार्मसींमधील लस पूर्णपणे सुरक्षित असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
आयसीएमआरच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे ९१ लाख प्राणी चावण्याच्या घटना घडतात. यापैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणे कुत्रे चावल्याची असतात. देशात रेबीजमुळे दरवर्षी ५,७०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारात ४० टक्के वाटा असणाऱ्या ‘अभयरॅब’च्या बनावट बाटल्या मिळणे ही चिंतेची बाब ठरली आहे.
चाचणी केलेल्या बाटलीमध्ये आणि उत्पादक कंपनीकडील अधिकृत संदर्भ नमुन्यात तब्बल १७ मोठे फरक आढळले आहेत : लेबल डिझाइन आणि आर्टवर्क, क्यूआर कोड पडताळणी, बाटलीच्या झाकणाचा रंग, पॅकेजिंगवरील मजकूर आणि परवाना तपशील.