Python Cooking And Eating | घराजवळ आलेला अजगरच मारुन शिजवून खाल्ला; केरळमधील तीन मित्रांचे भयंकर कृत्‍य! 
राष्ट्रीय

Python Cooking And Eating | घराजवळ आलेला अजगरच मारुन शिजवून खाल्ला; केरळमधील तीन मित्रांचे भयंकर कृत्‍य!

केरळमधील त्रिशूर येथील धक्कादायक प्रकार, वनखातेही चक्रावले, तिघांची रवानगी कोठडीत

Namdev Gharal

python hunting काहीवेळा अशा घटना समोर येतात की त्‍या ऐकून धक्काच बसतो. अशीच घटना केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातून समोर आली आहे. याठिकाणी तिघा मित्रांनी घराजवळ आलेल्या एका अजगराची शिकार करुन त्‍याचे मांस शिजवून खाल्ले आहे. मांस शिजवल्यानंतर त्‍यांनी त्‍यांच्या इतर मित्रानांही बोलवून अजगराचे मांस खायला घातल्याची माहिती समोर आली आहे. जिनसन जोस (३६), जिष्णू (३०) आणि विवेक (३०, सर्व रा. चेरुकुन्नू, मन्नामंगलम) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्व मन्नामंगलम येथीर रहिवासी आहेत.

चीन आफ्रिकेमध्ये खाल्ले जाते मांस

अजगर मारुन खाणे हे आपल्याकडे खूपच दुर्मिळ आहे. चिन, आफ्रिकेतील काही देश, व्हिएतनाम आदी देशांमध्ये अजगाराचे मांस खाल्ले जाते पण भारतात असे करणे वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा आहे त्‍यामुळे या तरुणांनी केलेल्या या कृत्‍याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील मन्नामंगलम भागात ही धक्कादायक घटना घडली असून, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपींच्या घराजवळ एक अजगर आढळला होता. अशा वेळी वन विभाग किंवा सर्पमित्रांना पाचारण करणे आवश्यक असताना, या तिघांनी अजगराला पकडले. त्यानंतर त्याचे तुकडे करून मांस शिजवले व इतर मित्रांसह खाल्ले. या घटनेची गुप्त माहिती मिळताच मन्नामंगलम वन स्थानकाचे उप-परिक्षेत्र वन अधिकारी एम. शाहजहान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान अजगराची हत्या आणि त्याचे मांस खाल्ल्याशी संबंधित पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

न्यायालयीन कोठडी आणि कायदेशीर कारवाई

आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या तिघांवर पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. न्यायालयीन कोठडी मिळाल्यास त्यांची रवानगी विय्यूर कारागृहात केली जाईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

३ ते ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद

त्रिशूर विभागीय वन कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक के. जी. जयकृष्णन यांनी सांगितले की, हे प्रकरण अजिबात किरकोळ नाही. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार (Wildlife Protection Act) अजगर हा अनुसूची १ अंतर्गत संरक्षित प्राणी आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ नुसार, अनुसूची १ मधील संरक्षित प्राण्याची शिकार करणे किंवा त्याचे मांस बाळगणे हा गंभीर व अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा ठरतो. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास ३ ते ७ वर्षांपर्यंतचा कारावास आणि किमान २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पुन्हा असा गुन्हा केल्यास दंडाची रक्कम १ लाख रुपयांपर्यंत वाढू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT