Putin's India visit:
मुंबई : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले आणि त्यानंतर ते दोघे एकाच कारमधून पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रवाना झाले. विशेष म्हणजे, ज्या कारमधून या दोन देशांच्या प्रमुखांनी प्रवास केला, ती कार मुंबई पासिंगची असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारताच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मॉस्कोहून निघालेले पुतीन गुरुवारी संध्याकाळी सुमारे ६ वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीत पोहोचले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विमानतळावर त्यांचे स्वागत केले. उभय नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर दोचेही एकाच वाहनातून रवाना झाले.
ही कार टोयोटा फॉर्च्युनर सिग्मा फोर होती आणि तिचा क्रमांक 'MH01EN5795' असा होता. या गाडीची नोंदणी दक्षिण मुंबईतील आरटीओ कार्यालयात 24 एप्रिल 2024 रोजी झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुतीन यांच्यासाठी त्यांची खास कार विमानतळावर आणलेली असतानाही, त्यांनी सुरक्षा प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये बसणे पसंत केले. पुतीन हे स्वतःच्या गाडीमध्ये किंवा त्यांच्या संरक्षण ताफ्यासोबत प्रवास करत नव्हते. दोन बलाढ्य देशांचे प्रमुख अशा पद्धतीने प्रवास करत असल्याने, त्यांच्यात झालेल्या चर्चांबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे.
आज होणाऱ्या २३ व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात विविध महत्त्वाच्या मुद्दघांवर सविस्तर चर्चा होईल. याच शिखर परिषदेत पंधराहून अधिक व्यापारी करार होण्याची शक्यता असून, दहा सामंजस्य करार उभय देशांच्या सरकारमध्ये होतील. शुक्रवारी औपचारिक चर्चेपूर्वी पुतीन यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाईल.