नवी दिल्ली : जगातील कोणत्याही देशाने भारताला 77 वर्षांपूर्वीचा हिंदुस्थान समजण्याची चूक करू नये. हा नवा भारत कोणत्याही देशापुढे झुकणार नाही आणि तो कोणत्याही देशासोबत आपल्या अटी आणि शर्तीवर व्यापारी संबंध प्रस्थापित करतो, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारतावर व्यापारी निर्बंध लादणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.
भारत रशियाकडून इंधन खरेदी करीत असल्याने ट्रम्प यांनी भारतावर जबर शुल्क लादले आहेत. पुतीन यांच्या दोनदिवसीय दौर्यात उभय देशांत धोरणात्मक भागीदारी होणार आहे. भारतात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. शाही भोजनाआधी पुतीन यांनी भारताच्या सामर्थ्याची प्रचिती जगाला दिली. यावेळी ते म्हणाले की, 150 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाने भूतकाळातून शिकून प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि सध्याचे पंतप्रधान मोदी यांच्यावर कोणताही देश दबाव टाकून आपले म्हणणे मान्य करायला लावू शकत नाही.
गेल्या काही वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि जगासमोर एक मोठी आर्थिक महाशक्ती म्हणून तो उदयास आला आहे. रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावर आणि त्यावर अमेरिकेकडून उपस्थित केल्या जाणार्या आक्षेपांशी संबंधित प्रश्नावर ते म्हणाले की, “मी माझ्या सहकार्यांचे कधीही चरित्र-चित्रण करत नाही. ज्यांनी माझ्यासोबत काम केले त्यांचेही नाही, आणि विशेषतः राष्ट्राध्यक्षांचे तर अजिबात नाही.“