Putin India visit
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. गुरूवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनैतिक प्रोटोकॉल तोडून विमानतळावर स्वत: पुतीन यांचे स्वागत केले. गेल्या काही वर्षांत मोदी यांनी अनेक देशाच्या राष्ट्रप्रमुखांचे किंवा सरकारच्या प्रमुखांचे वैयक्तिकरित्या स्वागत करून पारंपारिक राजनैतिक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्या देशाच्या प्रमुखांचे स्वागत स्वत: केले आहे, जाणून घ्या सविस्तर...
पुतीन यांचा हा दौरा २०२१ नंतरचा पहिला भारत दौरा आहे. हा दोन दिवसीय राजकीय दौरा असून, यामध्ये २३ वी भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. या शिखर परिषदेत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची अपेक्षा आहे.
परदेशी राष्ट्राध्यक्ष किंवा सरकार प्रमुखांचे विमानतळावर स्वागत करण्याची जबाबदारी मंत्री, वरिष्ठ अधिकारी किंवा प्रोटोकॉल अधिकाऱ्यांवर असते. मात्र, पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी या प्रमाणित राजनैतिक नियमांना बाजूला सारून वैयक्तिक काही महत्त्वाच्या जागतिक नेत्यांचे स्वागत केले आहे. असे संबंधित देशांसोबतचे जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध दर्शविण्यासाठी केले जाते. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे विमानतळावर स्वतः उपस्थित राहून स्वागत केले आहे. यामध्ये खालील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
तत्कालीन अबु धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे फेब्रुवारी २०१६ मध्ये नवी दिल्लीत त्यांच्या राजकीय भेटीदरम्यान मोदींनी स्वागत केले होते. भारतीय माध्यमांनी या स्वागताला प्रोटोकॉलमधील स्पष्ट बदल असे वर्णन केले होते.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे एप्रिल २०१७ मध्ये मोदींनी विमानतळावर स्वतः स्वागत केले होते.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे सप्टेंबर २०१७ मध्ये अहमदाबाद येथे भारत-जपान शिखर परिषद आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कोनशिला समारंभापूर्वी मोदींनी स्वागत केले होते.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मोदींनी मार्च २०१८ मध्ये नवी दिल्लीत विमानतळावर स्वागत केले होते.
जॉर्डनचे राजे अब्दुल्ला II यांचे फेब्रुवारी २०१८ मध्ये नवी दिल्लीत त्यांच्या राजकीय भेटीसाठी आगमन झाल्यावर मोदींनी स्वागत केले होते.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे जानेवारी २०१८ मध्ये नवी दिल्लीत विमानतळावर स्वागत केले होते.
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे फेब्रुवारी २०१९ मध्ये मोदींनी वैयक्तिकरित्या स्वागत करण्यासाठी प्रोटोकॉल मोडला होता.
फेब्रुवारी २०२५ मध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचे नवी दिल्लीत स्वागत केले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे २०२० मध्ये मोदींनी स्वागते केले होते.