Truck Driver wins 12 crore पंजाबमधील मोहाली येथे एका ट्रक चालकाचे नशीब फळफळले असून त्याला बंपर लॉटरी लागली आहे. या ड्रायव्हरने लॉटरीमध्ये तब्बल १२ कोटी रुपये जिंकले आहेत. त्यांनी ५०० रुपयांचे तिकीट खरेदी केले होते. गेल्या १५ वर्षांपासून आपण सातत्याने लॉटरीचे तिकीट खरेदी करत होतो, असे लॉटरी विजेते ट्रक चालक बलजिंदर सिंह यांनी सांगितले आहे. बलजिंदर यांनी याबद्दल देवाचे आभार मानले असून मला विश्वास होता की कधीना कधी मला लॉटरी लागेल म्हणून ते आज सत्य झाले आहे.
पंजाबच्या मोहाली जिल्ह्यात राहणाऱ्या या ट्रक ड्रायव्हरचे नशीब एका रात्रीत पालटले आहे. बलजिंदर सिंह यांनी २०२६ च्या 'पंजाब स्टेट डिअर दिवाळी बंपर लॉटरी'चे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस १२ कोटी रुपये जिंकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बलजिंदर सिंह गेल्या १५ वर्षांपासून न चुकता प्रत्येक सणाला लॉटरीचे तिकीट खरेदी करत होते. अखेर त्यांच्या या विश्वासाला फळ मिळाले आहे. नशीबाने त्यांना यंदा साथ दिली आहे एका रात्रीत ते करोडोचे मालक झाले आहेत.
ट्रक चालक असलेले बलजिंदर सिंह हे मोहालीच्या डेरा बस्सी भागातील हुमायूंपूर गावचे रहिवासी आहेत. या मोठ्या यशानंतर बलजिंदर सिंह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ते स्वतःला खूप भाग्यवान समजतात. लॉटरीच्या माध्यमातून श्रीमंत होण्याचे त्यांचे अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे.
'मला नेहमीच आशा होती' - बलजिंदर
बलजिंदर सिंह यांना दोन मुले आहेत. ते १५ वर्षांहून अधिक काळापासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत होते, मात्र त्यांनी याबाबत कधीही आपल्या कुटुंबीयांना सांगितले नव्हते. बलजिंदर सिंह म्हणाले की, "मी २०१० पासून सणासुदीला लॉटरीचे तिकीट खरेदी करत आलो आहे. एक दिवस देव माझी प्रार्थना नक्की ऐकेल आणि मला लॉटरी लागेल, अशी मला नेहमीच आशा होती." बलजिंदर यांच्या लॉटरी जिंकल्याची बातमी कळताच त्यांच्या गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी बदजिंदर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे अभिनंदन करत आहेत आणि मिठाई वाटून आनंद साजरा करत आहेत.
संगरुरमध्येही एकाने जिंकले १ कोटी रुपये
दरम्यान लॉटरी विभागाने १६ नोव्हेंबर रोजी 'पंजाब स्टेट डिअर दिवाळी बंपर २०२६' ची सोडत काढली होती. यामध्ये पंजाबमधील संगरूर येथे एका व्यक्तीने १ कोटी रुपयांची लॉटरी जिंकले. मात्र, अनेक दिवस शोध घेऊनही अद्याप त्या विजेत्याची ओळख पटलेली नाही. संगरूर बस स्थानकाजवळील लॉटरी स्टॉलवरून हे तिकीट खरेदी केले गेले आहे.