पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगत राय मंगा यांची मोगा येथे गोळ्या झाडून हत्या केली. मंगत राय हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी ३ जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री मोगा येथील गिल पॅलेसजवळ त्यांच्यावर गोळीबार झाला होता.
हल्लेखोरांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अरुण उर्फ दीपू, अरुण उर्फ सिंघा आणि राजवीर उर्फ लड्डो, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोगा आणि मलौत पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. हल्लेखोर लपलेल्या ठिकाणाला पोलिसांनी वेढा घातला. यावेळी पोलीस पथकावर त्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार सुरू केला. या चकमकीत तीन्ही संशयित आरोपी गोळ्या लागून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मोगा येथील गिल पॅलेसजवळ तीन गुंडांनी त्याच्यावर गोळीबार केला. मंगत अॅक्टिव्हाने जात होते. गोळीबार होताना पाहून त्यांनी त्यांची अॅक्टिव्हा तिथेच सोडून पळायला सुरुवात केली. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. काही अंतर गेल्यावर हल्लेखोरांनी त्यांना स्टेडियम रोडवर घेरले. त्यांच्यावर गोळ्या झाडून पळून गेले. रस्त्याने जाणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मंगत यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वैयक्तिक वैमनस्यातून हल्लेखोरांनी मंगत राम मंगा यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारादरम्यान, ११ वर्षांच्या मुलासह इतर दोघे जण जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी सहा आरोपी आणि काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगलराम यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी हिंदू संघटनांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मोगा-फिरोझपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा मंगत राम मंगा यांच्या कुटुंबाने घेतला होता.