Punjab firecracker blast
चंदीगड : पंजाबच्या मुक्तसर साहिब जिल्ह्यातील सिंघेवाला-फतुहीवाला गावात फटाक्याच्या कारखान्यात गुरुवारी रात्री मोठा स्फोट झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
सिंघवली-कोटली रस्त्यालगत फटाके उत्पादन आणि पॅकेजिंग करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की इमारत कोसळली आणि अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. रात्री साडेबाराच्या सुमारास कारखान्याच्या फटाक्याच्या उत्पादन युनिटमध्ये ही दुर्घटना घडली. स्फोटात किमान २५ जण जखमी झाले. स्थानिक अधिकारी, अग्निशमन दल आणि आपत्ती प्रतिसाद पथके घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू आहे.
कारखान्याच्या पॅकिंग युनिटमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मते, सुमारे ४० कर्मचारी येथे दोन शिफ्टमध्ये काम करायचे. त्यापैकी काही त्यांच्या कुटुंबासह येथे राहत होते. बहुतेक कर्मचारी उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याचे सांगण्यात येत आहे. कारागीर अरुण सक्सेना यांनी सांगितले की, ते रात्री कारखान्यासमोरील रिकाम्या जागेत झोपले होते. अचानक स्फोट झाला आणि काही क्षणातच संपूर्ण इमारत पत्त्यांच्या इमारतीसारखी कोसळली, अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले.
लांबी येथील रहिवासी जसपाल सिंह यांनी सांगितले की, हा कारखाना सिंगे वाला-फुतुहिवाला येथील तरसेम सिंह नावाच्या व्यक्तीचा आहे. ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. अखिल चौधरी, पोलिस अधीक्षक मनमीत सिंह, लांबीचे उप पोलिस अधीक्षक जसपाल सिंह आणि किलियानवली पोलिस स्टेशनचे प्रभारी करमजीत कौर घटनास्थळी पोहोचले. डॉ. चौधरी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असे सांगितले.