Punjab Blast: पंजाबमध्ये तासाभरात वेगवेगळे दोन स्फोट झाल्यानं पंजाब हादरला आहे. आधीच राज्यात राजकीय रस्सीखेच सुरू आहे त्यात हे स्फोट झाल्यानं वातावरण तंग झालं आहे. अमृतसरमध्ये रात्री १०.५० ला खासा कँटोनमेंट भागात स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. स्फोटाचा आवाज आल्याची माहिती मिळताच पोलीस आणि लष्करी जवान घटनास्थळी पोहचले.
अमृतसर एसपी आदित्य एस वारियर यांनी सांगितलं की, बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या टीम घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. ते तेथून पुरावे गोळा करणार आहेत. 'आम्ही नेमके किती ब्लास्ट झाले आहेत याची खातरजमा करत आहोत. घटनास्थळावरून सॅम्पल घेऊन ते लॅबमध्ये पाठवले आहेत सध्याच्या घडीला तरी कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.
दरम्यान, एक तासापूर्वी जालंदरमध्ये पार्क केलेल्या स्कूटरमध्ये स्फोट झाला होता. ही स्कूटर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या पंजाब फ्रिंटीयर हेडक्वार्टरच्या बाहेर पार्क केली होती. साधारणपणे सायंकाळी आठ वाजता स्थानिकांना मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे स्फोट एक अपघात होता की घातपात हे आताच सांगणे शक्य नाही. जालंदर पोलीस कमिश्नर धनप्रीत कौर यांनी सांगितलं की प्रथमदर्शनी पार्क केलेल्या स्कूटरला आग लागली असल्याचे दिसून येत आहे. मात्र या प्रकरणी वेगवेगळे अँगल देखील तपासले जात आहेत.