पुढारी ऑनलाईन : भाजपचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी पंजाबमधील असल्याचे सांगून राजस्थानातील श्रीगंगानगरचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोन तरुण नशेच्या अवस्थेत दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर हरभजन सिंग सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.
भाजपचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी काल एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये नशेच्या अवस्थेत दोन तरुण दिसत आहेत. मात्र, नंतर हा व्हिडिओ पंजाबमधील नसून राजस्थानमधील असल्याचे समोर आले. त्यानंतर सोशल मीडियावर हरभजन सिंग यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
खरंतर, पगडी घातलेल्या दोन तरुणांचा व्हिडिओ शेअर करत हरभजन सिंग यांनी पंजाबमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, पंजाबला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. ज्या पंजाबची ओळख प्रगती, धैर्य आणि शौर्यासाठी होती, तेथील तरुण आज नशेच्या आहारी जात आहेत, असे म्हणत त्यांनी पंजाब सरकारवरही निशाणा साधला. तसेच पंजाबला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
व्हिडिओ शेअर केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हरभजन सिंग यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. पंजाबच्या कॅबिनेट मंत्री डॉ. बलजीत कौर यांनी हा व्हिडिओ पंजाबमधील नसून राजस्थानातील श्रीगंगानगरचा असल्याचे सांगितले.
हरभजन सिंग यांच्यावर पंजाबला बदनाम केल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, आपल्या राजकीय आकांना खूश करण्यासाठी त्यांनी चुकीचा व्हिडिओ शेअर करून पंजाबची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.
हरभजन सिंग यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती नशेच्या अवस्थेत दिसत आहेत. त्यांना इतकी नशा झालेली आहे की, त्यांना नीट उभेही राहता येत नाही. भाजप खासदारांनी हा व्हिडिओ पंजाबमधील असल्याचे सांगितले होते. मात्र, हा व्हिडिओ राजस्थानातील श्रीगंगानगरचा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणावर अद्याप हरभजन सिंग यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हरभजन सिंग यांच्या या पोस्टवरून पंजाबमध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही व्यक्तींबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.