राष्ट्रीय

राष्ट्रपतींच्या ‘अ‍ॅट होम’मध्ये दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव

देश-विदेशातील निवडक आणि माध्यम जगतातील प्रमुखांसह सहभाग

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित प्रतिष्ठित अशा ‘अ‍ॅट होम’ कार्यक्रमात दैनिक ‘पुढारी’ वृत्तसमूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांच्या उपस्थितीने माध्यम जगतात एक विशेष ओळख अधोरेखित झाली.

देश-विदेशांतील निवडक पाहुण्यांसोबत या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण डॉ. योगेश जाधव यांना मिळाले. यामुळे केवळ त्यांच्या व्यक्तिगत कार्याची दखल घेतली गेली असे नाही; तर पत्रकारितेच्या क्षेत्रात पुढारी माध्यम समूहाने निर्माण केलेला दबदबा आणि विश्वासार्हता अधिक भक्कमपणे समोर आली.

या अत्यंत देखण्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमध्ये युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला वैश्विक उंची प्राप्त झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, अश्विनी वैष्णव यांच्यासह काही मंत्री उपस्थित होते.

अनोखे स्वागत

कार्यक्रमासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचताच सर्व पाहुण्यांचे एरी रेशीमने खास तयार करण्यात आलेली शाल देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. या शालीचे वैशिष्ट्य म्हणजे ती हाताने विणली जाते. ‘शांती सिल्क’ किंवा ‘अहिंसा सिल्क’ या नावानेही ही रेशीम ओळखली जाते. पूर्वोत्तर भारताच्या समृद्ध वस्त्र परंपरेचे ते एक जिवंत प्रतीक मानले जाते. या शालीवर पूर्वेकडील आठ राज्यांतील पशु-पक्षी आणि फुलांची डिझाईन असते. डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांचेही असेच अनोखे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रपतींशी संवाद

पूर्वोत्तर राज्यातील कला, संस्कृती आणि आहार अशी या कार्यक्रमाची मुख्य थीम होती. पाहुण्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच पारंपरिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. यादरम्यान, राष्ट्रपतींनी डॉ. योगेश जाधव यांची भेट घेत अनौपचारिक संवादही साधला. त्यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

माध्यम जगतातील खास आमंत्रितांमध्ये डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची उपस्थिती खास करून उल्लेखनीय राहिली. त्यांचे संपादकीय नेतृत्व, संतुलित पत्रकारिता आणि राष्ट्रीय कार्यात दै. ‘पुढारी’च्या भूमिकेचा यानिमित्ताने सन्मानच झाला. या ऐतिहासिक व्यासपीठावरील डॉ. जाधव यांच्या उपस्थितीने जबाबदार आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेची दखल सत्ता आणि समाज नेहमीच घेत असतो, हा महत्त्वाचा संदेश दिला गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT