दिल्ली : PUBG खेळणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. 13 नोव्हेंबर 2025 पासून PUBG कन्सोल फक्त PlayStation 5 आणि Xbox Series X/S वरच उपलब्ध राहणार असल्याची घोषणा दक्षिण कोरियातील गेम कंपनी क्राफ्टनने केली आहे. यानंतर PlayStation 4 आणि Xbox One साठीचा सपोर्ट पूर्णपणे संपुष्टात येईल. म्हणजेच या तारखेपासून जुने कन्सोलवर ही गेम ना खेळता येईल ना डाउनलोड करता येईल.
गेल्या सात वर्षांपासून PS4 आणि Xbox One वर गेमर्सना 'चिकन डिनर' मिळवून देणाऱ्या PUBG चा हा प्रवास थांबवण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. डेव्हलपर टीमच्या मते, खेळाडूंना अधिक स्थिर आणि स्मूथ गेमप्ले अनुभव देता येईल. भविष्यातील अपडेट्स आणि नवीन फीचर्स जुन्या कन्सोलवर योग्य प्रकारे चालवणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत होते. तसेच, जुन्या डिव्हाइसवर होणारे गेम क्रॅश आणि परफॉर्मन्सच्या समस्या कायमच्या दूर करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. डेव्हलपर क्राफ्टनने नियोजित सर्व्हर देखभालीदरम्यान हा निर्णय जाहीर केला. 13 नोव्हेंबरनंतर ही गेम फक्त PlayStation 5, Xbox Series X आणि Xbox Series S या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहील. जुन्या जनरेशनवरील खेळाडूंना PUBG: Battlegrounds डाउनलोड किंवा अॅक्सेस करता येणार नाही. यामुळे जवळपास आठ वर्षांपासून सुरू असलेला जुन्या हार्डवेअरवरील सपोर्ट संपुष्टात येणार आहे.
जे खेळाडू PS5 आणि Xbox Series X/S वर PUBG खेळतील, त्यांना अनेक फीचर्सचा अनुभव घेता येणार आहे:
उत्तम ग्राफिक्स आणि व्हिज्युअल्स: गेमचे ग्राफिक्स अधिक आकर्षक असेल.
स्थिर फ्रेमरेट्स: गेम खेळताना अडथळे येणार नाहीत आणि फ्रेमरेट्स अधिक स्थिर राहतील. कंपनीचे लक्ष्य सर्व प्लॅटफॉर्मवर 60 FPS (फ्रेम्स पर सेकंड) गेमिंगचा अनुभव देणे आहे.
नवीन मोड्स: Xbox Series S वापरकर्त्यांसाठी रिझोल्यूशन मोड आणि परफॉर्मन्स मोड असे पर्याय उपलब्ध असतील, ज्यामुळे ते आपल्या आवडीनुसार गेमिंग अनुभव निवडू शकतील.
खेळाडूंचे सध्याचे अकाउंट डेटा आणि खरेदी केलेल्या वस्तू आपोआप नवीन जनरेशन कन्सोलवर ट्रान्सफर होतील. यासाठी वेगळ्या प्रक्रियेची गरज नाही. मात्र, PlayStation वापरकर्त्यांना PS5 व्हर्जन PlayStation Store मधून मॅन्युअली डाउनलोड करावे लागेल, तर Xbox वापरकर्त्यांना Smart Delivery द्वारे हे अपडेटेड व्हर्जन आपोआप मिळेल.