Lok Sabha Election 2024 Live result  
राष्ट्रीय

ओडिशात तिरंगी लढतींमुळे विजयाचे पारडे दोलायमान

सोनाली जाधव

[author title="सुनिल डोळे " image="http://"][/author]

ओडिशामध्ये तिरंगी लढतींमुळे सर्वच मतदार संघात तीव्र चुरस दिसत आहे. विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता हे सत्तारूढ बिजू जनता दलाचे भांडवल आहे. भाजपने येथे भक्कम पक्ष संघटनेच्या जोरावर बिजदपुढे जोरदार आव्हान उभे केले आहे. काँग्रेसही या राज्यात काही जागा मिळवण्याची अपेक्षा बाळगून आहे.

ओडिशात मयूरभंज, बालासोर, भद्रक, जाजपरू, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या सहा लोकसभा मतदार संघांसाठी एक जून रोजी अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे.
मयुरभंज : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथूनच 1997 मध्ये आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. सर्वप्रथम नगरसेविका म्हणून त्या विजयी झाल्या होत्या. नंतर 2000 मध्ये त्या मयुरभंज विधानसभा मतदार संघातून निवडून गेल्या. मग नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे परिवहन खाते सोपविण्यात आले होते. यावेळी बिजू जनता दलाने (बिजद) सुदाम मरांडी यांना मैदानात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने नबाचरण मांझी यांना संधी दिली आहे. ते मुर्मू यांच्या विश्वासातील मानले जातात. झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) पक्षप्रमुख शिबू सोरेन यांची कन्या अंजली सोरेन यांना तिकीट दिले आहे. मरांडी 2004 मध्ये 'झामुमो'मध्ये होते. नंतर त्यांना बिजदमध्ये प्रवेश केला. येथील तिरंगी लढत रंगतदार बनली आहे.

बालासोर : भाजपच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या लेखाश्री सामंतसिनघर यांना बिजदने येथून तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने खासदार प्रतापचंद्र सारंगी यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेसने श्रीकांत जेना यांना संधी दिली आहे. तेही मातब्बर उमेदवार मानले जातात. तिन्ही नेते तगडे असल्यामुळे येथील मुकाबला अटीतटीचा होण्याचे संकेत आहेत.

भद्रक : बिजदने येथून खासदार मंजुलता मंडल यांना मैदानात उतरविले असून, त्यांच्या विरोधात भाजपने बिजद नेते आणि खासदार अर्जुन सेठी यांचे चिरंजीव अविमन्यू सेठी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. गेल्या वेळी अविमन्यू यांना मंडल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. काँग्रेसने अनंतप्रसाद सेठी यांना संधी दिली आहे.

जाजपूर : बिजदने येथून खासदार शर्मिष्ठा सेठी यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. काँग्रेसने त्यांच्या विरोधात आचल दास यांना संधी दिली असून, गेल्या वेळचे पराभूत उमेदवार अमियकांता मलिक यांचा पत्ता कट करून भाजपने रवींद्रनारायण बेहरा यांना संधी दिली आहे. या राखीव मतदार संघावर बिजदचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे शर्मिष्ठा लागोपाठ दुसर्‍यांदा विजय मिळवण्याची अपेक्षा बाळगून आहेत. भाजपने मजबूत पक्ष संघटनेच्या जोरावर येथे जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येते. त्यामुळे खरी लढत भाजप आणि बिजद यांच्यातच होणार आहे.

केंद्रपाडा : अंशुमन मोहंती यांच्यावर बिजदने यावेळी येथून डाव खेळला आहे. बैजयंतजय पांडा यांना पुन्हा एकदा भाजपने मैदानात उतरविले आहे. काँग्रेसने सिद्धार्थस्वरूप दास यांना संधी दिली आहे. गेल्या वेळी येथून बिजदच्या तिकिटावर अनुभव मोहंती यांनी बाजी मारली होती. यावेळी त्यांच्याऐवजी अंशुमन यांना बिजदने उमेदवारी दिली आहे. बिजद, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना येथे मोठा जनाधार असल्यामुळे यावेळची लढत अटीतटीची होईल, असे संकेत मिळत आहेत. तिन्ही उमेदवारांनी प्रचारात कसलीही कसर बाकी ठेवली नव्हती.

जगतसिंहपूर : बंगालच्या खाडीला लागून असलेला हा मतदार संघ निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटकांची येथे रेलचेल असते. खासदार डॉ. राजश्री मलिक यांना येथून बिजदने पुन्हा संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात भाजपने विभूप्रसाद तराई यांच्यावर तिसर्‍यांदा डाव खेळला आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांत त्यांना हार पत्करावी लागली होती. काँग्रेसने रवींद्रकुमार सेठी यांना मैदानात उतरवले आहे. हा मतदार संघ बिजदचा गड मानला जातो.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT