पाटणा; वृत्तसंस्था : दशकानुदशके देशावर सत्ता गाजवूनही काँग्रेस पक्ष गरिबी हटवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला, काँग्रेसच्या काळात केवळ आश्वासने दिली गेली. मात्र, आमच्या सरकारने प्रामाणिक हेतूने काम करून तब्बल ५० कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. २१) केली. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात ‘नितीश सेतू’ राष्ट्राला समर्पित केल्यानंतर आणि ३४,४७० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केल्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते.
नितीश कुमार-सुशासनाचे कौतुक
वैशाली जिल्ह्यातील राजापाकर येथे आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विकासकामांचा गौरव केला. तीन दशकांपूर्वी बिहारमधील जनतेने आशा आणि विश्वास गमावला होता. राज्य निराशेच्या गर्तेत अडकले होते. मात्र, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहारला ‘सुशासना’चा विश्वास मिळाला, असे मोदी म्हणाले. मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि त्यांचे सहकारी नितीश कुमारांच्या मार्गदर्शनाखाली बिहारला वेगाने प्रगतीच्या पथावर नेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. २००५ पूर्वी राज्यात घोटाळे आणि गुन्हेगारीची आकडेवारी मोजली जायची, आता गुंतवणूक आणि गुन्हेगारांवरील कारवाईची आकडेवारी मोजली जाते, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘नितीश सेतू’मुळे उत्तर-दक्षिण बिहार जोडले जाणार
गंगा नदीवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक केबल-स्टेड ‘नितीश सेतू’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान उपस्थित होते. सुमारे ४,२८० कोटी रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प १९.७ किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये गंगेवरील ९.७ कि.मी.चा मुख्य पूल आणि १० कि.मी.च्या जोडमार्गांचा समावेश आहे. हा पूल पाटणा जिल्ह्यातील कच्ची दरगाह आणि वैशाली जिल्ह्यातील बिदुपूरला जोडतो. यामुळे उत्तर आणि दक्षिण बिहारमधील वाहतूक अत्यंत सुरळीत होऊन प्रादेशिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
कौशल्य असलेल्यांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाही
लखनौ : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी, ज्यांच्याकडे प्रत्यक्ष कौशल्य आहे, त्यांचा रोजगार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. केवळ पदवीचे प्रमाणपत्र असणाऱ्यांपेक्षा कौशल्यपूर्ण कामगारांना भविष्यात अधिक सन्मान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लखनौमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित पाचव्या राष्ट्रीय कौशल्य दीक्षांत समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते.
विचारांच्या मर्यादा ओलांडल्याने देशाची खरी क्षमता समोर येते
खरगपूर : विचारांच्या मर्यादा ओलांडून संधींची नवी दारे कशी उघडता येतात आणि गरिबांचे सक्षमीकरण कसे करता येते, हे भारताने गेल्या १२ वर्षांत दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. २१) केले. भारतातील पहिल्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी खरगपूर) संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.