नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी(२६ नोव्हेंबर) संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. हा उत्सव म्हणजे संविधान निर्मात्यांना आदरांजली असल्याचे ते म्हणाले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली, त्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
किरेन रिजीजू म्हणाले की, भारताच्या संसदेचा उत्सव हा एक प्रकारे भारताच्या संविधानाचा सन्मान आहे. संविधान दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान संबोधित करणार नाहीत. फक्त राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती बोलतील. दुसरे म्हणजे, आम्ही लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांना व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केली आहे, असे रिजिजू यांनी सांगितले.
मंगळवारी, सकाळी ११ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये येतील. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. या कार्यक्रमात मैथिली आणि संस्कृत भाषेमधील भारतीय संविधानाचे प्रकाशन केले जाणार आहे.