Priyanka vs Rahul Gandhi काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी केला आहे. प्रियांका गांधी यांचे सुपुत्र रेहान वाड्रा यांच्या छायाचित्र प्रदर्शनातील काही फोटो हटवण्यावरून निर्माण झालेल्या वादावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी मौन बाळगले असून याचा संदर्भ देत भाजपने हा आरोप केला आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी प्रियांका गांधी यांचा राहुल गांधींवरील राजकीय विश्वास उडाला आहे का, असा सवाल उपस्थित केला. वाद निर्माण करून प्रियांका गांधी आपल्या मुलाचे राजकारणात 'सॉफ्ट-लाँच' (पदार्पण) करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी सध्या वैयक्तिक दौऱ्यासाठी व्हिएतनामला गेले असून, त्यांनी अद्याप या वादावर कोणतेही वक्तव्य किंवा पोस्ट केलेली नाही. त्यांच्या या मौनाचा आधार घेत भाजपने गांधी भावंडांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कथित SIR अनियमिततेविरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राहुल आणि प्रियांका यांनी एकत्रितपणे निदर्शने केली होती.
प्रदीप भंडारी यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे: "प्रियांका वाड्रा यांचा संपूर्ण प्रयत्न हा वाद उभा करून आपल्या मुलाचे सॉफ्ट-लाँच करण्याचा होता. त्यांचा राहुल गांधींवरील राजकीय विश्वास आता संपला आहे! व्हिएतनाममधून प्रत्येक मुद्द्यावर मत मांडणारे राहुल गांधी यांनी आतापर्यंत रेहान वाड्रा यांच्या समर्थनार्थ एकही ट्विट उघडपणे केलेले नाही. काँग्रेसमध्ये आता उघडपणे प्रियांका विरुद्ध राहुल असा संघर्ष सुरू आहे!"