नवी दिल्ली : लोकसभेत संविधानावरील चर्चेला सत्ताधारी पक्षाकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने प्रियंका गांधी यांना संधी दिली. आपल्या पक्षाच्या विश्वासावर खरे उतरत वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी सत्ताधारी पक्षाला सहजतेने आणि सौम्यतेने कोंडीत पकडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी परिपक्वता दाखवली आणि ईव्हीएमपासून शेतकरी ते दलितांपर्यंतच्या मुद्द्यांवर आपली मते मांडून सरकारला कोंडीत पकडले.
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी १३ तारखेला १३.१३ वाजता आपले भाषण सुरू केले. प्रियंका गांधी यांनी लोकसभेत हे ३३ मिनिटांचे पहिले भाषण केले. यात त्यांनी अदानी, ईव्हीएम, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिनिहाय जणगणना, महाराष्ट्र, गोवा यासह अनेक राज्यांतील निवडून आलेली सरकारे पाडणे, आदी मुद्दे उपस्थित केले. यासोबतच, प्रियंका गांधी यांनी सत्ताधारी पक्षाने विविध प्रकरणांमध्ये चौकशीला सामोरे जाणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सत्ताधारी पक्षात समावेश केल्याचा खरपूस समाचार घेतला.
केरळमधील वायनाड ते उत्तर प्रदेशातील ललितपूरचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेचाही उल्लेख केला. उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचार, उन्नाव येथील दलित मुलीवरील बलात्कार आणि मृत्यूचे प्रकरण, आग्रा पोलीस ठाण्यात स्वच्छता कर्मचारी अरुण वाल्मिकी यांचा मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबावर पोलिसांनी केलेले अत्याचार यांचा संदर्भ देत त्यांनी संविधान आणि कायद्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. देशात सत्ताधारी पक्षाने १९७५ चा उल्लेख केला असता, प्रियंका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना चुकांमधून धडा घेण्याचा सल्ला दिला. काँग्रेसने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. तूम्हीही चूक सुधारा आणि मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या, 'दूध का दूध और पानी का पानी' होईल, असेही त्या म्हणाल्या.
प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता एका कथेच्या माध्यमातून त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, प्रत्येकाने लहानपणी राजाची गोष्ट ऐकली असेल. राजा आपली टीका ऐकण्यासाठी वेषांतर करून जनतेत जात असे. आजच्या राजालाही वेषांतर करण्याची खूप आवड आहे, मात्र जनतेत जाण्याची हिंमत नाही आणि टीका ऐकायचीही नाही. सत्यमेव जयते म्हणत त्यांनी भाषणाचा शेवट केला.