प्रियांका गांधी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.  Pudhari Photo
राष्ट्रीय

प्रियांका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ

Priyanka Gandhi | संविधानाची प्रत घेऊन सभागृहात दाखल

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज (दि.२८) लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी परिधान करून आणि हातात संविधानाची प्रत घेऊन त्या सभागृहात दाखल झाल्या होत्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रविंद्र चव्हाण यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

गुरुवारी, लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यावर पहिल्यांदा दोन्ही खासदारांना शपथ देण्यात आली. प्रियंका गांधी यांनी हिंदीतून तर रविंद्र चव्हाण यांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेतली. खासदारकीची शपथ घेताना प्रियंका गांधी यांच्या हातात भारतीय संविधानाची प्रत होती. प्रियांका गांधी जेव्हा पद आणि गोपनीयतेची शपथ घेत होत्या, तेव्हा त्यांचे भाऊ राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या. आता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तिघेही खासदार म्हणून संसदेत उपस्थित राहणार आहेत.

प्रियांका गांधी वाड्रा वायनाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्यांना 6.22 लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सत्यन मोकेरी यांच्यापेक्षा त्यांना 4 लाखांहून अधिक आणि भाजपच्या नव्या हरिदास यांच्यापेक्षा 5.12 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. संसदेतील गांधी घराण्यातील त्या तिसऱ्या सदस्या ठरल्या आहेत. त्यांची आई सोनिया गांधी या राजस्थानमधून पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत. तर भाऊ राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रविंद्र चव्हाण यांनी भाजप उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव केला आहे.

प्रियंका गांधीच्या पेहरावामुळे इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा

प्रियंका गांधी यांनी खासदारकीची शपथ घेताना केरळ कासवू साडी परिधान केली होती. कासवू साडी केवळ एक पोशाख नाही; केरळच्या सांस्कृतिक ऐक्याचे ते प्रतीक आहे. या साडीमुळे इंदिरा गांधींच्या आठवणींनाही उजाळा दिला. संसदेत इंदिरा गांधी त्यांच्या कार्यकाळात अनेकदा अशाच पारंपारिक साड्यांमध्ये दिसल्या होत्या. प्रियांकाच्या पारंपारिक पोशाखाच्या निवडीचा खूप सखोल अर्थ आहे. त्यांच्या साडीचे इंदिरा गांधींशी साम्य होते. त्याचबरोबर केरळच्या लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा एकूण पेहराव इंदिरा गांधीची आठवण ताजी करणारा होता.  शपथविधीनंतर बोलताना प्रियंका गांधी यांनी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची आठवण आल्याचेही म्हटले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT