नवी दिल्ली : लोकसभेत सोमवारी शून्य प्रहरात प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी विजय दिवसानिमित्त आपले मत मांडत होत्या. त्यांचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या सदस्यांना बोलायला संधी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसने सभागृहात गदारोळ केला आणि सभागृहातून सभात्यागही केला.
प्रियांका गांधी विजय दिनानिमित्त सभागृहात बोलणार होत्या. त्याचवेळी सरकारच्या वतीनेही विजय दिनानिमित्त सभागृहाला संबोधित करण्याबाबत चर्चा सुरू होती. सरकारच्या वतीने आपले मत मांडून झाल्यानंतर प्रियंका गांधी यांना बोलू दिले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र सरकारच्या मंत्र्याऐवजी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना बोलू देण्यात आले. त्यामुळे काँग्रेस सदस्य संतप्त झाले. काँग्रेसच्या गदारोळात लोकसभा अध्यक्षांनी प्रियंका गांधींना बोलण्याची परवानगी दिली.
प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विजय दिनानिमित्त १९७१ च्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून केली. आज विजय दिन असून १९७१ मध्ये देशाने मिळवलेला विजय लष्कर आणि जवानांच्या बळावरच शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या. त्यावेळी देश एकटा उभा राहिला. बांगलादेशातील लोकांचे कोणी ऐकत नव्हते. त्यावेळी भारतातील जनता एकजूट होऊन सैन्याच्या पाठीशी उभी राहिली. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी मोठे धाडस आणि नेतृत्व दाखवले आणि देशाचा विजय झाला. दरम्यान, प्रियंका गांधींचे बोलणे पुर्ण होण्यापुर्वीच लोकसभा अध्यक्षांनी दुसऱ्या वक्त्यांना बोलण्यासाठी सांगितले. त्यावर काँग्रेस खासदारांनी आक्षेप घेतला. प्रियंका गांधी यांच्या विनंतीवरून पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करण्याची संधी दिली.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, मला दोन मुद्दे मांडायचे आहेत. पहिला मुद्दा बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू आणि ख्रिश्चनांचे काय होत आहे. केंद्र सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलावीत. दुसरे म्हणजे, पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयाचे छायाचित्र लष्कराच्या मुख्यालयातून हटवण्यात आले आहे. या छायाचित्रात पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण करताना दिसत आहे. याबाबतही प्रियंका गांधी यांनी सरकारकडे जाब विचारला.