नवी दिल्ली: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आतापर्यंतच्या नीचांकावर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी देशाला उत्तर द्यावे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी रुपया आणि डॉलरच्या तुलनेवरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन म्हटले आहे की, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका डॉलरची किंमत ८६.४ रुपये झाली आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात, जेव्हा एका डॉलरची किंमत ५८-५९ रुपये होती. तेव्हा नरेंद्र मोदी रुपयाच्या मूल्याला सरकारच्या प्रतिष्ठेशी जोडत असत. ते म्हणायचे, मला सगळे माहिती आहे. कोणत्याही देशाचे चलन असे घसरू शकत नाही. आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आणि रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले आहेत. त्यांनी देशातील जनतेला उत्तर द्यावे, असे गांधी यांनी म्हटले आहे.