रायपूर; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून जात आणि धर्माच्या मुद्द्यावर दिशाभूल केली जात असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वधेरा यांनी केली.
छत्तीसगडमधील दौर्यावेळी महिला समृद्धी संमेलनातील कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, जात-धर्मावरून मोदी सरकार लोकांमध्ये भ्रम पसरवत आहे. लोकांनी प्रश्नच विचारता कामा नये, अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे. जनतेच्या भावनांशी खेळ सुरू आहे. मोदी यांचे उद्योगपती मित्र रोज 1600 कोटी मिळवत आहेत. त्याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत. महागाई गगनला भिडली असून बेरोजगारांची संख्या वाढली आहे. ज्वलंत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठीच जाती-धर्माचे राजकारण केले जात आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना गाडीतून त्यांच्या मतदारसंघात जात होते. त्यावेळी लोकांशी बोलण्यासाठी ते गाडीतून उतरले. त्यावेळी एका महिलेने ओरडून खराब रस्त्यांबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी त्यांच्या सोबत होते. महिला ओरडल्यामुळे आपणास त्रास झाला का, अशी विचारणा मी माझ्या वडिलांना केली होती. प्रश्न विचारण्याचे कर्तव्य महिलेने केले असून उत्तर देण्याचे काम माझे आहे, असे त्यांनी आपणास सांगितले होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
एक उद्योगपती दिवसाला 1600 कोटी मिळवत असताना दुसर्या बाजूला शेतकरी 27 रुपये मिळवत आहे. जी-20 मधून देशाची मान उंचावली. मात्र यावर उधळलेल्या वारेमाप खर्चाचे काय, दोन विमानांसाठी प्रत्येकी 8 हजार कोटी खर्च केले आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.