Priyanka Chaturvedi Pudhari Photo
राष्ट्रीय

Priyanka Chaturvedi: एक्सवर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल ठाकरेंच्या खासदाराचं मोदी सरकारला पत्र!

माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे व्यक्त केली चिंता

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा) च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी गुरुवारी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांचा वापर करून महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या कथित गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या कृतींमुळे महिलांच्या गोपनीयतेचे गंभीर उल्लंघन होते. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रात लिहिले म्हटले की, सोशल मीडियावर, विशेषतः 'एक्स' वर, एआय ग्रोकचा गैरवापर केला जात आहे. यामध्ये पुरुष बनावट खात्यांचा वापर करून महिलांचे फोटो पोस्ट करत आहेत. ग्रोकला चुकीच्या सूचना करून आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. हे केवळ बनावट खात्यांद्वारे फोटो शेअर करण्यापुरते मर्यादित नाही, तर ज्या महिला स्वतःचे फोटो पोस्ट करतात त्यांनाही लक्ष्य केले जात आहे. हे अस्वीकार्य आहे आणि एआयचा हा घोर गैरवापर आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याहून वाईट गोष्ट म्हणजे, ग्रोक अशा विनंत्या मान्य करून या वर्तनाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या.

सदर प्रकार हा महिलांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. तसेच महिलांच्या फोटोचा अनधिकृत वापर केला जात आहे, जो केवळ अनैतिकच नाही तर गुन्हेगारी देखील आहे, असे त्यांनी म्हटले. प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' विरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची आणि महिलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एआय-आधारित साधनांमध्ये सुरक्षा उपाय लागू करण्याची विनंती केली आहे.

पत्रात चतुर्वेदी म्हणाल्या की, सर्जनशीलता आणि नाविन्याच्या नावाखाली महिलांच्या प्रतिष्ठेचे सार्वजनिकरित्या आणि डिजिटल माध्यमांतून उल्लंघन होत असताना भारत मूकदर्शक राहू शकत नाही. इतर मोठ्या प्लॅटफॉर्मवरही असेच प्रकार घडत आहेत, ज्यावर कोणतेही नियंत्रण नाही. एक राष्ट्र म्हणून आपण याला प्राधान्याने हाताळले पाहिजे जेणेकरून महिला अशा उघडपणे गुन्हेगारी कृत्यांच्या बळी ठरणार नाहीत आणि त्यांना या प्लॅटफॉर्मवरून गप्प केले जाणार नाही किंवा बाहेर काढले जाणार नाही, असे पत्रात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT