DRDO Missile Technology | खासगी कंपन्याही बनवणार क्षेपणास्त्रे; स्वदेशी संरक्षण क्षमता बळकट करण्याच्या दिशेने पाऊल B Mathur
राष्ट्रीय

DRDO Missile Technology | खासगी कंपन्याही बनवणार क्षेपणास्त्रे; स्वदेशी संरक्षण क्षमता बळकट करण्याच्या दिशेने पाऊल

डीआरडीओने विकसित केलेले तंत्रज्ञान वापरता येणार; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रस्तावाला दिली मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेत आता खासगी कंपन्याही मोठी भूमिका बजावणार आहेत. आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेली क्षेपणास्त्रे केवळ सरकारी कंपनीच नाही, तर भारतातील खासगी कंपन्याही तयार करू शकतील, असा निर्णय सरकारने घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश संरक्षण साहित्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशातील संरक्षण यंत्रणांच्या निर्मितीमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवणे हा आहे. यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राचा विस्तार होण्यास व स्वदेशी संरक्षण क्षमता बळकट होण्यास मदत होईल.

यापूर्वी डीआरडीओ क्षेपणास्त्र बनवायचे, त्याची चाचणी करायची आणि नंतर त्याच्या उत्पादनाची जबाबदारी ‘बीडीएल’ (भारत डायनॅमिक्स लिमिटेड) या सरकारी कंपनीकडे सोपवली जायची, अशी पद्धत होती. मात्र, आता तसे होणार नाही. सरकारने तंत्रज्ञान हस्तांतरणाचे मार्ग खुले केले आहेत. डीआरडीओचे तंत्रज्ञान आता अदानी डिफेन्स, टाटा, महिंद्रा, भारत फोर्स यांसारख्या भारतीय कंपन्यांनाही मिळणार आहे. या कंपन्या फॅक्टरी उभारून स्वतः क्षेपणास्त्रे बनवू शकतील. कंपनीकडे आवश्यक प्रमाणपत्रे आणि गुणवत्ता असणे गरजेचे आहे, ही अट मात्र असेल. गुणवत्तेची अंतिम तपासणी डीआरडीओच करेल. देशातील जवळपास सर्वच प्रमुख पारंपरिक क्षेपणास्त्रे खासगी क्षेत्रात तयार केली जाऊ शकतील.

लष्कराला होणार फायदा

लष्कराला लवकरात लवकर क्षेपणास्त्रे मिळणार : आतापर्यंत 'बीडीएल'वर प्रचंड ताण होता, ऑर्डर्स प्रलंबित होत्या. खासगी कंपन्यांमुळे उत्पादनाचा वेग वाढेल.

हजारो कोटींची बाजारपेठ : लष्राला ३० हजार कोटींची अनंत शस्त्र प्रणाली, १ हजार आकाश-NG आणि ३७० प्रलय क्षेपणास्त्रे हवी आहेत. एवढी मोठी ऑर्डर आता भारतीय कंपन्यांना मिळणार आहे.

रोजगारात वाढ : अदानी समूहाने मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे २५०० कोटी रु.च्या क्षेपणास्त्र कारखान्याची उभारणी सुरूही केली आहे.

आयातवरील अवलंबित्व कमी होणार.

कोणती क्षेपणास्त्रे यात समाविष्ट नाहीत?

अणुबॉम्ब वाहून नेणारी रणनीतिक क्षेपणास्त्रे (उदा. अग्नी आणि के सीरिज) यामध्ये समाविष्ट नाहीत. तसेच रशियाच्या सहकार्याने बनवलेली 'ब्रह्मोस'सारखी क्षेपणास्त्रेही या निर्णयाच्या कक्षेत नाहीत.

कोणती क्षेपणास्त्रे बनवली जाणार?

शत्रूची लढाऊ विमाने आणि ड्रोन नष्ट करणारी आकाश आणि आकाश-NG

हवेतून हवेत मारा करणारी, २०० किमीहून अधिक पल्ल्याची अस्त्रे.

शत्रूचे बंकर उद्ध्वस्त करणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे प्रलय.

रणगाडाविरोधी (टँक भेदी) नाग आणि SANT क्षेपणास्त्रे.

शत्रूचे रडार नष्ट करणारी रुद्रम.

समुद्रात शत्रूच्या जहाजावर हल्ला करणारी NASM-SR.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT