राष्ट्रीय

PM Narendra Modi : २२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत! ‘घुसून मारलं, अणुबॉम्बच्या धमक्या पोकळ ठरवल्या’; पीएम मोदींची लोकसभेत डरकाळी

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानच्या घडामोडींची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संवादाचा तपशील उघड केला.

रणजित गायकवाड

PM Narendra Modi speech discussion on Operation Sindoor in Lok Sabha

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशावर बोलताना पाकिस्तानला अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला आहे. पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील, असे आपण अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनाही स्पष्टपणे सांगितल्याचा खुलासा त्यांनी केला. त्याचवेळी, या संवेदनशील प्रसंगी काँग्रेस पक्ष 'बालिशपणा' करत होता आणि देशाच्या सुरक्षा दलांचे मनोधैर्य खच्ची करत होता, असा घणाघाती आरोपही पंतप्रधानांनी केला.

पाकिस्तानने हल्ला केल्यास महागात पडेल : अमेरिकेलाही थेट उत्तर

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानच्या घडामोडींची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संवादाचा तपशील उघड केला. ते म्हणाले, ‘जगातील कोणत्याही नेत्याने भारताला कारवाई थांबवण्यासाठी सांगितले नाही. मात्र, नऊ तारखेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते जवळपास तासभरापासून प्रयत्न करत होते, परंतु मी लष्कराशी चर्चा करण्यात व्यस्त होतो. फोनवर त्यांनी मला सांगितले की, पाकिस्तान खूप मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे.’

यावर आपण दिलेल्या उत्तराविषयी पंतप्रधान म्हणाले, "माझे उत्तर स्पष्ट होते. ज्यांना समजून घ्यायचे नाही, त्यांना ते समजणार नाहीच. मी खडावले.. म्हणालो; ‘जर पाकिस्तानचा असा इरादा असेल, तर त्यांना ते खूप महागात पडेल. आम्ही गोळीचे उत्तर गोळ्याने देऊ.’

२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत; पाकिस्तानचे अनेक हवाई तळ 'ICU' मध्ये

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले, ‘आम्हाला अभिमान आहे की ६ आणि ७ मे च्या रात्री आम्ही ठरवल्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. आम्ही हल्ला केला, पण पाकिस्तान काहीही करू शकला नाही. आम्ही २२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची झोप आजही उडालेली आहे.’

त्यांनी कारवाईची तीव्रता स्पष्ट करताना सांगितले, ‘आम्ही अशा ठिकाणी घुसून मारले, जिथे यापूर्वी कधीही गेलो नव्हतो. दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमक्या आम्ही पोकळ ठरवल्या. भारताने हे सिद्ध केले की, असे ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही आणि भारत अशा धमक्यांपुढे झुकणार नाही. आम्ही पाकिस्तानच्या छाताडावर अशी जखम दिली आहे की, त्यांचे अनेक हवाई तळ आजही 'ICU' अर्थात अति दक्षता विभागात आहेत,’ असा टोला लगावला.

वीर जवानांच्या पराक्रमाला काँग्रेसचा पाठिंबा नाही : पंतप्रधानांचा हल्लाबोल

या कारवाईवर विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘हे दुर्दैव आहे की, जगातील १९० देशांचा पाठिंबा मिळाला, पण माझ्या देशाच्या वीर जवानांच्या पराक्रमाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही. २२ एप्रिलच्या हल्ल्यानंतर तीन-चार दिवसांतच ते उड्या मारू लागले आणि 'कुठे गेली ५६ इंचांची छाती?', 'मोदी कुठे हरवले?', 'मोदी तर अपयशी ठरले', असे म्हणत आनंद लुटत होते. त्यांना पहलगाममधील निष्पापांच्या हत्येतही राजकारण दिसत होते.’’

पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘आपल्या स्वार्थी राजकारणासाठी माझ्यावर निशाणा साधताना त्यांची वक्तव्ये आणि त्यांचा बालिशपणा देशाच्या सुरक्षा दलांचे मनोधैर्य खच्ची करत होता. काँग्रेस नेत्यांचा ना भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, ना भारतीय सैन्यावर. ते सातत्याने ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते.’’

दहशतवादाला संपवणे हाच राष्ट्रीय संकल्प

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना देशातील जनतेचे आभार मानले. ‘‘दहशतवादाला सडेतोड उत्तर देणे हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान देशातील जनतेने ज्या प्रकारे मला साथ दिली आणि आशीर्वाद दिले, त्यामुळे माझ्यावर देशातील जनतेचे कर्ज आहे. मी सर्व देशवासीयांचे आभार व्यक्त करतो,’’ असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT