राष्ट्रीय

रिल्स पाहू नका! त्याऐवजी सरावावर भर द्या! : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रिल्स पाहू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. अर्जुनाची व पक्ष्याच्या डोळ्याची गोष्ट नजरेसमोर ठेवा. सरावावर भर द्या. जितका सराव कराल, तितके परिपूर्ण व्हाल, अशा आश्वासक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात हितगुज साधले. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरातील दहावी – बारावी विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. दिल्ली येथील भारत मंडपम येथे हा संवाद आयोजित करण्यात आला होता.

लहानपणापासून आपण अर्जुन आणि पक्ष्याच्या डोळ्याची गोष्ट ऐकत आलो आहोत. ती आपल्या जीवनातही लागू करा. आधी संपूर्ण पेपर वाचा आणि मग काय लिहायचे हे बघा. आज परीक्षेतील सर्वात मोठे आव्हान लेखन हे आहे. त्यामुळे सरावावर लक्ष केंद्रित करा. परीक्षेपूर्वी विषय किंवा जे वाचले आहे, त्याबद्दल लिहा आणि नंतर स्वतः दुरुस्त करा. तुम्ही जितके जास्त लिहाल तितका अधिक धारदारपणा मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.

तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मोबाईल फोन वापरत असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, मी फोन चार्ज केला नाही, तर त्याचा वापर कमी होईल. काम करण्यासाठी मोबाईल चार्ज करावा लागत असेल तर बॉडीही चार्ज करावी. याचा अर्थ असा नाही की, कुस्ती खेळावी लागेल. एक पुस्तक घ्या आणि सूर्यप्रकाशात वाचा. कारण शरीर रिचार्ज करण्यासाठी सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता असते, असेही पंतप्रधानांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.

तुम्ही एकामागून एक रिल्स पाहात राहिल्यास वेळ वाया जाईल, झोपेचा त्रास होईल आणि तुम्ही काय वाचले आहे ते आठवणार नाही. झोपेला कमी लेखू नका. आधुनिक आरोग्य विज्ञान झोपेला खूप महत्त्व देते. तुम्हाला आवश्यक ती झोप मिळते की नाही याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे सांगत मोदी यांनी विद्यार्थ्यांनी रिल्स पाहू नयेत, असे कळकळीचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी दिल्या दहा टिप्स

1. लेखन सर्वात महत्त्वाचे; त्यामुळे सरावावर भर द्या.
2. शरीरही रिचार्ज करा. एखादे पुस्तक सूर्यप्रकाशात वाचा.
3. मोबाईलप्रमाणे शरीरही रिचार्ज करा.
4. पुरेशी झोपही घ्या. रिल्स पाहणे टाळा.
5. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा.
6. सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे गोंधळ. तो टाळा.
7. स्पर्धा मित्रांशी नको तर स्वत:शी करा.
8. दडपण झेलायला शिका. त्यावर मातही करा.
9. टार्गेट निश्चित करा. त्याप्रमाणे रणनीती आखा.
10. जितके शक्य आहे, तितके लिहा आणि धारदार व्हा.

SCROLL FOR NEXT