Chenab Rail Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ६) सकाळी ११ वाजता जम्मूमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. पंतप्रधान इंजिनमध्ये बसून चिनाब आर्च पुलावरून केबल स्टे अंजी पुलावर पोहोचले. येथे त्यांनी रेल्वेच्या अंजी पुलाचेही उद्घाटन केले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह पूल बांधकाम कामगारांची भेट घेतली.जाणून घेवूया जगातील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची वैशिष्ट्ये...
काश्मीर खोर्याला देशाच्या अन्य भागाशी सुलभतेने जोडणारा एक भव्य पूल चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही त्यांची उंची अधिक आहे. हा रेल्वे पूल 40 किलोग्रॅम टीएनटी स्फोटकांचा स्फोट किंवा 8 रिश्टर स्केलची तीव्रता असलेल्या भूकंपाचा धक्काही सहन करू शकतो. विशेष म्हणजे स्फोटानंतरही या पुलावरून ताशी 30 किलोमीटर वेगाने रेल्वे जाऊ शकते. हा पूल 1,315 किलोमीटर लांबीचा असून तो ताशी 260 किलोमीटर वेगाने वाहणार्या वार्याचा आघात सहन करू शकतो. या पुलावर एक फुटपाथ आणि एक सायकल मार्गही बनवण्यात आला आहे.
चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पूल बारामुल्लास उधमपूर-कटरा-काजीगुंडमार्गे जम्मूला जोडणारा आहे. या पुलाची लांबी 1315 मीटर आहे. त्यामध्ये 467 मीटरचा मेन आर्क स्पेस आहे. हा आतापर्यंत बनवलेल्या कोणत्याही ब्रॉड गेज लाईनवरील सर्वाधिक लांबीचा आर्क स्पॅन आहे. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवर (324 मीटर) पेक्षा 35 मीटर उंच आणि कुतुब मीनारपेक्षा सुमारे पाच पट अधिक उंचीचा आहे. हा चिनाब रेल्वे पूल विकासाच्या बाबतीत एक मैलाचा दगड ठरणार आहे.
दिल्लीतून काश्मीरमध्ये ट्रकमधून सामान येत असते. त्यामध्ये सुमारे 48 तासांपेक्षाही अधिक वेळ जातो. हा पूल सुरू झाल्यावर ट्रेनने मालवाहतूक केली जाऊ शकेल व वेळेत 20 ते 22 तासांची घट होईल. या पुलासाठी आतापर्यंत 30,350 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. नदीपासून 359 मीटर उंचीवर हा पूल आहे. हा पूल 120 वर्षे टिकून राहील असे त्याचे डिझाईन बनवलेले आहे. भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचे हा पूल एक प्रतीक बनला आहे.
दरम्यान, उत्तर रेल्वे शनिवार, ७ जूनपासून कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू हेणार आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून ६ दिवस दोन गाड्या धावतील.उत्तर रेल्वेने सांगितले की ट्रेनमध्ये दोन प्रवास वर्ग आहेत. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १३२० रुपये आहे. सध्या गाड्या फक्त बनिहाल येथे थांबतील, इतर थांब्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही, हिमवर्षावाच्या काळात काश्मीरचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटलेला असतो. राष्ट्रीय महामार्ग-४४ बंद असल्याने, खोऱ्यात जाण्याचा मार्ग बंद आहे. याशिवाय, जम्मू ते काश्मीर रस्त्याने जाण्यासाठी ८ ते १० तास लागत होते. ट्रेन सुरू झाल्यानंतर, हा प्रवास सुमारे तीन तासांत पूर्ण होईल.
,,, ,