नवी दिल्ली : देशभरामध्ये बुधवारी, महाशिवरात्री साजरी करण्यात आला. भगवान महादेवाची पूजा करुन देशवासियांनी समृद्धी, सुख, शांती यासाठी प्रार्थना केली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘एक्स’वर पोस्टमध्ये म्हटले की, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना मनापासून शुभेच्छा. प्रार्थना करते की महादेवाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावेत आणि आपला देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, सर्व देशवासियांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांना आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो आणि विकसित भारताचा संकल्प बळकट करो. हर हर महादेव!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील ‘एक्स’वर पोस्ट करुन देशवासियांना महाशिवरात्रीच्या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महादेवाचे आशीर्वाद सर्वांवर राहोत, तुमच्या आयुष्यात समृद्धी, प्रगती आणि आनंद राहो, हीच माझी प्रार्थना आहे, असे खर्गे म्हणाले. तर शिवशक्तीचे आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव राहोत, असे राहुल गांधी म्हणाले.