नवी दिल्ली ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन, दोघीही भारतीय संस्कृती, परंपरा जपणार्या उच्चपदस्थ महिला आहेत, हे विशेष. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी सीतारामन गेल्या असता याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
गोल्डन बॉर्डर असलेली क्रीम कलरची मधुबनी पेंटिंगची साडी परिधान करून सीतारामन संसदेत पोहोचल्या. त्यापूर्वी त्या राष्ट्रपती भवनात गेल्या. तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना दही आणि साखर खाऊ घालून त्यांचे स्वागत केले. यानंतर सीतारामन टॅबलेट घेऊन संसद भवनात पोहोचल्या. अर्थमंत्री त्यांच्या घरातून प्रथम राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. येथे त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घेतली. त्यावेळी राष्ट्रपतींनी त्यांना दही आणि साखर खाऊ घालून त्यांचे असे पारंपरिक स्वागत केले. आपल्या देशात अशी परंपरा आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी जात असताना किंवा प्रवासाला जाण्यापूर्वी दही आणि साखर खावे. देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत जात असलेल्या अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींनी या परंपरेनुसारच दही-साखर खाऊ घातले !