नवी दिल्ली : 1) राष्ट्रपती मुर्मू यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. २) राष्ट्रपतींना त्र्यंबकेश्वराची मूर्ती भेट देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. 3) राष्ट्रपतींना महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरेचा मानबिंदू असलेली येवला पैठणी भेट देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. 
राष्ट्रीय

Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचे राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रण

मुख्यमंत्र्यांसह १२ लोकांच्या शिष्टमंडळाने भेटून दिले निमंत्रण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निमंत्रण दिले.

राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना ध्वजारोहण सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण दिले. याप्रसंगी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषिसमृद्धी व खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही प्रदान केला. ध्वजाराहेणदिनीच होणारी गोदा आरती, कुंभमेळा प्राधिकरण संकेतस्थळाचे उद्‌घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफी टेबल बूक आणि कुंभमेळा टपाल तिकिटाचे अनावरण यासाठीदेखील राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले.

कुंभमेळा-महाराष्ट्र संस्कृती दर्शवणारे अनोखे निमंत्रण

राष्ट्रपतींना दिलेले निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक माहात्म्य व भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉपअप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीचा महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केलेले आहे.

शिष्टमंडळात ‘हे’ मान्यवर

शिष्टमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबकच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचाही समावेश होता.

निमंत्रण संचात काय?

आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सची उत्पादने

अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ

मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, वनमध

महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरेचा मानबिंदू असलेली येवला पैठणी

काळ्या मनुका व काजू, नाशिकचा प्रसिद्ध चिवडा, निवडक मिठाई, सुकामेवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT