CP Radhakrishnan file photo
राष्ट्रीय

CP Radhakrishnan: सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. १२) १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

मोहन कारंडे

CP Radhakrishnan

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. १२) १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते उपराष्ट्रपती असा त्यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत झाला आहे.

  • नाव : चंद्रपूरम पोन्नुसामी राधाकृष्णन

  • जन्म तारीख : ४ मे १९५७

  • जन्म स्थान : तिरुपूर, तामिळनाडू

  • शिक्षण : बीबीए

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ४५२ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा दणदणीत पराभव केला. रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत विशेष म्हणजे, 'एनडीए'मध्ये नसलेल्या १४ खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याचे समोर आल्यामुळे विरोधकांची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी सी. पी. राधाकृष्णन यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

सी. पी. राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूसह देशाच्या विविध भागांत राजकारण, तसेच सार्वजनिक जीवनातील एक परिचित व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. वयाच्या १६ व्या वर्षी सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून जीवनाची सुरुवात केली. १९७४ मध्ये भारतीय जनसंघाच्या टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन राज्य कार्यकारी समितीचे सदस्य झाले. १९९६ मध्ये त्यांना तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. १९९८ मध्ये ते पहिल्यांदा तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथून लोकसभेवर निवडून आले. १९९९ मध्ये ते पुन्हा एकदा कोईम्बतूर लोकसभेवर निवडून आले. आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योगसंबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थविषयक संसदीय सल्लागार समितीचेदेखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.

२००४ साली सी. पी. राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचेदेखील ते सदस्य होते. २००४-२००७ पर्यंत ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. या पदावर असताना त्यांनी ९३ दिवसांची 'रथयात्रा' काढली होती. या रथयात्रेने १९,००० कि. मी. प्रवास केला. २०१६ मध्ये सी. पी. राधाकृष्णन हे कोची येथील कॉयर (नारळ फायबर) बोर्डाचे अध्यक्ष झाले. त्यांनी ४ वर्षे हे पद भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातून नारळाच्या तागाची निर्यात २,५३२ कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली.

२०२० ते २०२२ पर्यंत ते केरळ भाजपचे प्रभारी होते. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. १९ मार्च २०२४ रोजी त्यांना तेलंगणा आणि पुद्दुचेरीचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. २७जुलै २०२४ रोजी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आले. १७ ऑगस्ट २०२५ रोजी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राधाकृष्णन हे 'एनडीए'चे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील, ही घोषणा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT