ओडिशा : पुढारी ऑनलाईन डेस्क
ओडिशाच्या डेरेबिस ब्लॉक मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी महिला व बालविकास विभागात कार्यरत असलेल्या वर्षा प्रियदर्शिनी या गर्भवती लिपिकाच्या सात महिन्यांच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) स्नेहलता साहू यांनी गर्भवती महिलेला त्रास दिला आणि प्रसूती वेदना होऊनही त्यांनी ना रजा दिली, ना वैद्यकीय मदत दिली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीडित महिला लिपिक वर्षा प्रियदर्शिनी यांनी गेल्या तीन वर्षांपासून माझा छळ करण्यात येत आहे ज्यामुळे माझ्या बाळाचा मृत्यू झाला असे त्यांनी म्हटले आहे. सीडीपीओ मॅडमने मला खूप त्रास दिला. मी गरोदर राहिल्यानंतर त्रास आणखी वाढला. मला खूप समस्यांना तोंड द्यावे लागले, पण तरीही मी काम करत होतो.
वर्षा प्रियदर्शिनी म्हणाल्या की, त्या गेल्या तीन वर्षांपासून सीडीपीओच्या छळाचा बळी पडत आहेत. गर्भधारणेदरम्यान छळ वाढला. प्रसूती वेदना असूनही सीडीपीओ स्नेहलता साहू यांनी कार्यालय सोडण्याची परवानगी दिली नाही किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली नाही.
मी जेंव्हा माझ्या वरीष्ठ अधिकारी साहू यांना या विषयी सांगितले तेंव्हा त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच मला उद्धटपणे उत्तरे दिली. यानंतर मला अधिक त्रास होउ लागल्याने मी त्याची माहिती माझ्या कुटुंबाला दिली तेंव्हा त्यांनी मला रूग्णालयात दाखल केले. तेंव्हा तपासल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या प्रकरणाबाबत राज्याच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी तातडीने कारवाई करत सीडीपीओ स्नेहलता साहू यांना त्यांच्या पदावरून हटवून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. चौकशीअंती कठोर पावले उचलली जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर अनिरुद्ध बेहरा यांनीही हे प्रकरण चौकशीनंतर उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवले जाईल, असे सांगितले आहे.