पुढारी ऑनलाईन डेस्क : Maha Kumbh 2025 | प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात संगम तीरावर चेंगराचेंगरी होऊन ३० जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (दि.२९) ५० लाखांची मदत जाहीर केली. तसेच या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत.
प्रयागराजच्या संगम तीरावर मौनी अमावस्येच्या निमित्ताने पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविकांनी गर्दी केली होती. यादरम्यान जागेसाठी धावपळ करत असताना मंगळवारी (दि.२८) मध्यरात्री दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी होऊन ३० भाविकांचा मृत्यू झाला तर ८० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, प्रयागराज कुंभमेळामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बॅरिकेड तुटल्यामुळे भाविकांची पळापळ झाली. यादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याने ३० जणांचा मृत्यू झाला. तर ८० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. या दुर्घटनेची तीन सदस्यांची समिती चौकशी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरूवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र, प्रयागराज महाकुंभातील दुर्घटनेनंतर त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला. प्रयागराजमध्ये अजूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांनी प्रयागराज येथील परिस्थितीवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.