रांची : प्रशांत किशोर यांच्या 'जन सुराज' पक्षाच्या सोशल मीडिया टीममध्ये कार्यरत असलेले देवपालिक गुप्ता (वय ३२) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. २६ ऑक्टोबर रोजी रांची येथून पाटण्याकडे जात असताना ते जनशताब्दी एक्स्प्रेसमधून अचानक बेपत्ता झाले होते. अखेर झारखंडमधील रांची ग्रामीण भागातील अनगडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरवादाग जवळील झाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवपालिक गुप्ता हे पाटण्यातील कदमकुआं परिसराचे रहिवासी होते आणि जन सुराज पक्षासाठी डिजिटल व सोशल मीडियाचे काम पाहत होते. २६ ऑक्टोबर रोजी ते रांचीवरून पाटण्याला जाण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेसने निघाले होते. प्रवासादरम्यान कुटुंबीयांशी त्यांचा संपर्क तुटल्याने नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. संपर्क न झाल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
बरवादाग परिसरातील रेल्वे रुळांलगतच्या झाडीमध्ये स्थानिकांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली असता, ओळखपत्रावरून हा मृतदेह बेपत्ता असलेले देवपालिक गुप्ता यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) पाठवला आहे. देवपालिक यांचा धावत्या ट्रेनमधून पडून अपघात झाला की त्यांच्यासोबत काही घातपात घडला, यादृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. याशिवाय, ते प्रवास करत असलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सची तपासणी केली जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.