Prashant Kishor Pudhari
राष्ट्रीय

Prashant Kishor : ३० वर्षांचा बालेकिल्ला ३० दिवसांत ढासळला; 'बांकीपूर'मधील भक्‍कम आघाडीनंतर प्रशांत किशोराचा भाजपवर निशाणा

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत २८ फेऱ्यांअखेर २० हजार मतांची आघाडी

पुढारी वृत्तसेवा

Prashant Kishor on Bankipur Bypoll Result : बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या २८ व्या फेरीअखेर 'जन सुराज' पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी आपली पकड अधिक मजबूत केली आहे. प्रशांत किशोर यांना ५९,२१३ मते मिळाली असून त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांच्यावर १९,४१९ मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. भाजपच्या नीरज कुमार यांना ३९,७९४ मते मिळाली आहेत, तर राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) उमेदवार रेखा कुमारी १३,२६० मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मताधिक्य सातत्याने वाढत असल्याने प्रशांत किशोर बांकीपूरच्या या लढतीत निर्णायक विजयाच्या दिशेने कूच करत आहेत.

'३० वर्षांचा बालेकिल्ला ३० दिवसांत ढासळला' : प्रशांत किशोर

बांकीपूरमधील ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेले जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी, हा निकाल केवळ एक आमदार निवडण्यापुरता मर्यादित नसून भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला दिलेला स्पष्ट संदेश आहे, असे प्रतिपादन केले. या मतदारसंघावर भाजपच्या दीर्घकालीन वर्चस्वाचा उल्लेख करत किशोर म्हणाले, "भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला अवघ्या ३० दिवसांत ढासळला आहे." तसेच बिहारला शिक्षण आणि रोजगारावर भर देणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील तरुणांचे स्थलांतर रोखणे हेच मुख्य ध्येय

आपल्याला मतदान करणाऱ्या जनतेचे आभार मानताना किशोर म्हणाले, "जनतेनेच हा कौल दिला आहे." ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही, त्यांचेही मन जिंकण्याचा प्रयत्न करू, असे सांगत राज्यातील तरुणांचे स्थलांतर रोखणे हेच मुख्य ध्येय असले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी झालेली नाही...

"ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी झालेली नाही. बिहारमध्ये एका योग्य आणि चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले पाहिजे, जेणेकरून राज्यात दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला देण्यासाठी ही निवडणूक होती. जनतेने हा संदेश स्पष्टपणे दिला आहे. मला मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांचा विश्वास जिंकण्याचाही मी प्रामाणिक प्रयत्न करेन. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहारला उत्तम नेतृत्व मिळायला हवे आणि राज्यातील तरुणांचे स्थलांतर थांबले पाहिजे," असेही ते म्‍हणाले.

"बिहारला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुख्यमंत्री नकोय"

पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "हा बांकीपूरच्या जनतेचा विजय आहे. आम्ही प्रचार दरम्यानच सांगितले होते की, ही निवडणूक केवळ एक आमदार निवडण्यासाठी नाही. बिहारच्या जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जनतेला असा मुख्यमंत्री हवा आहे जो राज्याचा विकास करू शकेल. डागाळलेले चारित्र्य, गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा संशयास्पद वर्तन असणाऱ्या व्यक्तीला बिहारचे नेतृत्व सोपवण्यास जनतेने स्पष्ट नकार दिला आहे."

'कंत्राटे वाटण्यासाठी आम्हाला आमदार व्हायचे नाही'

भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर टीका करताना जन सुराज प्रमुखांनी नमूद केले, "आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि अमित शाह यांनी बिहारचा विकास कसा होईल, तरुणांना नोकऱ्या कशा मिळतील आणि स्थलांतर कसे थांबेल यावर लक्ष केंद्रित करायला हवे. हेच आमचे एकमेव ध्येय आहे. केवळ कंत्राटे वाटण्यासाठी आम्हाला आमदार व्हायचे नाही, तर बिहारचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे."दरम्यान, मतमोजणीत प्रशांत किशोर यांची आघाडी सातत्याने वाढत असल्याने पटना येथे 'जन सुराज'च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

३० वर्षांच्या घराणेशाहीला सुरूंग

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ (पूर्वीचा पटना पश्चिम) हा भाजपचा १९९५ पासूनचा अभेद्य गड मानला जातो. तब्बल ३० वर्षांपेक्षा जास्त काळ या मतदारसंघावर एकाच कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. आधी भाजप नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नबीन यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर नितीन नबीन यांनी राज्यसभा खासदारकीसाठी बांकीपूरच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक पार पडली. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन यांनी ५०,००० पेक्षा जास्त मतांच्या प्रचंड फरकाने बांकीपूरमधून विजय मिळवला होता. अशा या भाजपच्या गडात शिरून प्रशांत किशोर यांनी मिळवलेली ही आघाडी सत्ताधारी पक्षाच्या प्रतिष्ठेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT